मुंबई : नव्या जमान्याच्या तंत्रज्ञानाधारीत वित्तीय सेवा अर्थात फिनटेक क्षेत्रासाठी स्वयं-नियामक यंत्रणा (एसआरओ) सज्ज करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सोमवारी मसुदा आराखडा प्रस्तावित केला असून, तो सूचना-हरकतींसाठी खुला केला आहे. ग्राहकांच्या हितरक्षणाला प्राधान्य देताना, फिनटेकना त्यांच्या नाविन्यपूर्ण, अनोख्या सेवांना फुलवण्यासाठी आवश्यक खुलेपण आणि नियम-कानूंची शिस्त यामध्ये संतुलन साधण्याचा या मसुदा प्रस्तावाचा उद्देश आहे.
हेही वाचा >>> हिवाळ्यात वाढत्या महागाईचा फटका, डिसेंबरमध्ये घाऊक महागाई दरात वाढ
आजच्या घडीला अनेक प्रक्रिया सुव्यवस्थित करून, ग्राहकांसाठी सुलभता आणि खर्चातही कपात करून वित्तीय सेवांचे परिदृश्य लक्षणीयरीत्या बदलण्यात आणि त्याला उन्नत आकार देण्यात ‘फिनटेक’ मोलाची भूमिका बजावत आहेत, याची मध्यवर्ती बँकेने हा मसुदा आराखडा जारी करताना दखल घेतली आहे. एकीकडे या उद्योग क्षेत्राद्वारे विकसित नवकल्पनांना प्रत्यक्षरूप घेणे सुलभ करणे आणि त्याचवेळी नियामक प्राधान्यक्रमांची पूर्तता केली जाईल हे पाहून ग्राहकहिताचे संरक्षण करणे, त्याचप्रमाणे फिनटेक क्षेत्राचे योगदान इष्टतम ठरण्यासाठी जोखीम घटकांची उचित काळजी घेतली जाणे महत्त्वपूर्ण आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
हेही वाचा >>> राम मंदिरामुळे सगळ्यांचाच उद्धार? देशात १ लाख कोटींचा व्यवसाय होणार
फिनटेक क्षेत्रांतर्गत ‘स्व-नियमन’ लागू करून हा इच्छित संतुलित दृष्टीकोन साधला जाणे अपेक्षित आहे, असे नमूद करून फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत हा मसुदा रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक अभिप्रायांसाठी खुला केला आहे. ही प्रस्तावित स्वयं-नियमन यंत्रणा (एसआरओ-एफटी) रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली फिनटेक क्षेत्राच्या निरोगी आणि शाश्वत विकासासाठी विश्वासार्हता आणि जबाबदारीसह प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.