FD Interest Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स कपात केल्यानंतर काही दिवसांनी, स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी निवडक मुदत ठेवींवरील व्याज दर कपात जाहीर केली आहे. मुदत ठेवींवरली व्याज दरांमध्ये झालेल्या या कपातीमुळे ठेवीदारांना मोठा फटका बसणार आहे. बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर, याचा मोठा परिणाम होणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दुसऱ्या धोरण आढावा बैठकीत रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्के केला होता. यामुळे गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे. या कपातीमुळे गृह कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहेत. मात्र, बँकांनी आता मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने मुदत ठेवीदांरांवरही याचा परिणाम होणार आहे.
एसबीआयच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात
देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ एप्रिलपासून ३ कोटी रुपयांपेक्षा कमी आणि एक ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर १० बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत.
एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता ६.७ टक्के व्याजदर मिळेल, जो पूर्वी ६.७ टक्के होता. दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी, सुधारित दर ६.९ टक्के असेल, जो पूर्वी ७ टक्के होता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, एसबीआय आता एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.२ टक्के (७.३ टक्के आधीचा दर) आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.४ टक्के (७.५ टक्के आधीचा दर) व्याजदर देत आहे.
दरम्यान एसबीआयने काही दिवसांपूर्वीच त्यांची अमृत कलश विशेष मुदत ठेव योजना मागे घेतली आहे, ज्यामध्ये ४०० दिवसांच्या कालावधीसाठी ७.१ टक्के व्याज देण्यात येत होते. ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ३१ मार्च २०२५ रोजी बंद करण्यात आली.
बँक ऑफ इंडियाचे मुदत ठेवींवरील व्याजदर
आणखी एक सरकारी बँक, बँक ऑफ इंडियाने १५ एप्रिल २०२५ पासून विविध मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींसाठीचा दर कमी केला आहे. आता बँक ऑफ इंडिया ९१ दिवस ते १७९ दिवसांच्या दरम्यानच्या मुदत ठेवींसाठी ४.२५ टक्के (४.५ टक्के आधीचा दर) आणि १८० दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी ५.७५ टक्के (६ टक्के आधीचा) व्याजदर देत आहे.
पण, एका वर्षाच्या ठेवींवर ७.०५ टक्के व्याजदर मिळेल, जो पूर्वी ६.८ टक्के होता, तर एका वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ६.७५ टक्के (६.८ टक्के) मिळेल.
बँक ऑफ इंडियाने ४०० दिवसांसाठीची त्यांची विशेष एफडी योजना मागे घेण्याची घोषणा केली आहे. ज्याद्वारे ठेविदारांना कमाल ७.३ टक्के व्याज मिळत होते.