लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पडणारे देयक व्यवहार सुरुळीतपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यूपीआय प्रणालीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयला मदतीसाठी पुढे येण्याचे शुक्रवारी आवाहन केले. मध्यवर्ती बँकेने पेटीएमचे आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्च २०२४ नंतर वॉलेट आणि तत्सम सेवांच्या व्यवहारास प्रतिबंध करणारा आदेश अलीकडेच दिला आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे संचालित ‘@paytm’ या हँडलच्या माध्यमातून पार पडणारे यूपीआय व्यवहार १५ मार्चनंतर सुरळीतपणे पार पडतील यासाठी एनपीसीआयला तृतीय-पक्ष सेवा प्रदाता प्रकियेचे परीक्षण करण्यास रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. तथापि पेटीएमचे सर्व विद्यमान वापरकर्ते नवीन हँडलवर पूर्णपणे स्थलांतरित होईपर्यंत या हँडलद्वारे कोणतेही नवीन वापरकर्ते जोडले जाणार नाहीत, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. पेटीएम ॲपच्या माध्यमातून पार पडणाऱ्या यूपीआय व्यवहारांसाठी पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडने ही विनंती केली आहे, असे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘@paytm’ या हँडलवरून पार पडणारे व्यवहार इतर बँकांकडे स्थलांतरित करण्यासाठी, एनपीसीआयकडून पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून चार ते पाच बँकांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>‘डीएचएफएल’च्या वाधवान बंधूंच्या बँक, डीमॅट खात्यांवर टाच 

देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे बँकेवर येत्या १५ मार्चपासून नवीन ठेवी स्वीकारण्यावर निर्बंध आले आहेत, तसेच अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहकही तिला नोंदवता येणार नाहीत.

पेटीएमचा समभाग सावरला

गेल्या चार सत्रांत पेटीएमची प्रवर्तक असलेल्या वन ९७ कम्युनिकेशनच्या समभाग मूल्यात २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. शुक्रवारच्या सत्रात ५ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेला स्पर्श करत समभाग १९.४० रुपयांनी वधारून ४०७.२५ रुपयांवर स्थिरावला. परिणामी कंपनीचे बाजार भांडवल पुन्हा २५ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi request for help from npci to keep paytm app operational print eco news amy
Show comments