मुंबई : रिझर्व्ह बँकेने विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याच वेळी विश्वास आणि स्थिरता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त मोदी बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले की, पुढच्या दशकात २०३५ साली रिझर्व्ह बँक तिच्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करेल. त्यामुळे मध्यवर्ती बँकेसाठी तितकेच महत्त्वाचे असलेले हे दशक, विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशासाठीही महत्त्वपूर्ण आहे. मध्यवर्ती बँकेने विश्वास आणि स्थिरता यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच वेगवान वाढीला या दशकात सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. २०१६ पासून महागाई नियंत्रणात ठेवणे हे रिझर्व्ह बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट बनले आहे. तथापि असेही अनेकदा सूर उमटले आहेत ज्यांनी दर कपातीसारख्या उपायांद्वारे विकासावर अतिरिक्त लक्ष देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> राज्यात ‘जीएसटी’पोटी वर्षभरात तीन लाख कोटींहून अधिक संकलन
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यासाठी नियोजित बैठकीच्या एक दिवस आधी पंतप्रधानांनी केलेल्या टिप्पणीला विशेष महत्त्व आहे. सहा सदस्यीय पतविषयक धोरण समितीने (एमपीसी) भूमिकेचे आणि महागाई नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांबद्दल मोदी यांनी कौतुक केले. समितीने गेल्या काही वर्षांत नेमून दिलेल्या वैधानिक जबाबदारीवर चांगले काम केले असल्याचेही मोदी म्हणाले. ते म्हणाले की, दोन अंकी महागाई दराचे प्रतिबिंब आधीच्या आर्थिक धोरणांमध्ये दिसत नव्हते. तथापि महागाई रोखण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला त्यांच्या कार्यकाळातच दिले गेल्याचा त्यांनी दावा केला.
महागाई नियंत्रण आणि विकास यांचा समतोल राखणे ही प्रत्येक विकसनशील देशाची अनन्यसाधारण गरज असल्याचे ते म्हणाले आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने योग्य आर्थिक साधनांचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये अनेक मान्यवर उद्योगपती, बँक प्रमुख, मध्यवर्ती बँकेचे आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.
ज्या वेळी जगातील अनेक देश अजूनही साथीच्या आजाराच्या वेळी झालेल्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था नवे विक्रम निर्माण करत आहे, असे मोदी म्हणाले. वित्तीय सुदृढीकरण आणि सक्रिय किंमत निरीक्षणासह सरकारच्या प्रयत्नांमुळे महागाई थंड होण्यास मदत झाली. – पंतप्रधान नरेंद्र मोदी