2000 RS Notes Withdrawal From Circulation : २००० रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या नोटा वितरणातून बाहेर काढल्या जाणार असून, लवकरच नोट बंद होणार आहे. ही बातमी ऐकून आपण गोंधळले असाल. पण आता घाबरण्याचं काही कारण नाही. विशेषत: ते लोक चिंतेत आहेत, ज्यांच्याकडे २००० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. नोटा वितरणातून बंद झाल्याचा अर्थ त्यांना किंमत नाही, असे नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना त्यांच्या नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. चला, जाणून घेऊया लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर.
RBIने आताच का नोटा वितरणातून बाद केल्या?
RBI ने २००० रुपयांच्या नोटा जास्त न छापण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा बाजारात आल्या होत्या. या प्रणालीतून त्वरित काढून टाकल्या जाणार आहेत. या नोटा छापण्याचा उद्देश पूर्ण झाल्याचा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे.
तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे, मग तुम्ही काय कराल?
तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या बदलून घेऊ शकता, यासाठी आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे.
आता २००० रुपयांची नोट चालणार की नाही?
२००० रुपयांची नोट पूर्णपणे कायदेशीर आहे. ती आता सिस्टममध्येही चालणार आहे. पण आता सामान्य व्यक्तीसुद्धा २ हजार रुपयांच्या नोटेनं व्यवहार करण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता आहे. कारण ती नोट आता बदलून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ती नोट बदलण्याचा त्रास टाळण्यासाठी दुकानदार ती घेणं टाळू शकतात.
हेही वाचाः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोदी सरकारला ८७,४१६ कोटी रुपये देणार
तुम्हाला २००० रुपयांच्या नोटा कुठे बदलून मिळतील?
आरबीआयने सांगितले की, २००० रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. म्हणजेच जर तुमचे खाते स्टेट ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल आणि तुमच्या घराजवळ पंजाब नॅशनल बँक (PNB) असेल, तर तुम्ही PNB मध्ये जाऊन २००० रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेला भेट देऊन या बदलून घेतल्या जाऊ शकतात.
२००० रुपयांच्या नोटा कधीपासून बदलू शकतो?
बँकामध्ये २३ मे २०२३ पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू राहणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत या नोटा कधीही बदलून घेता येतील.
एका वेळी २००० रुपयांच्या किती नोटा बदलू शकतो?
बँकेच्या सामान्य कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी एकाच वेळी २०,००० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच २३ मे २०२३ पासून तुम्ही २००० रुपयांच्या नोटा एकावेळी १० नोटा म्हणजेच २०,००० रुपयांपर्यंत बदलू शकता.
२००० रुपयांची नोट कधीपर्यंत बदलता येईल?
तुमच्याकडे २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी पुरेसा वेळ असेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. आरबीआयने सांगितले आहे की, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील. म्हणजेच या नोटा बदलून घेण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत वेळ असेल.
हीसुद्धा नोटाबंदी आहे का?
नाही. ही नोटाबंदी अजिबात नाही. २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध राहतील. त्या अद्याप बंद केल्या गेल्या नाहीत. फक्त त्या सिस्टममधून काढून घेण्यासाठी वेळ दिला जात आहे. ज्या उद्देशासाठी त्या छापल्या होत्या तो आता पूर्ण झाला आहे, असे आरबीआयला वाटते.