लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पर्यावरणाच्या दृष्टीने समस्या बनलेल्या आणि दररोज हजारो टनांच्या प्लास्टिक्सच्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून, त्यापासून उच्च गुणवत्तेच्या पॉलिमरची घटकांमध्ये रूपांतरित करणारा महत्त्वपूर्ण संयुक्त भागीदारी उपक्रमाची घोषणा री सस्टेनिबिलिटी अँड रिसायकलिंग प्रा. लि. (पूर्वाश्रमीची रामकी एन्व्हायरो इंजिनीयर्स) आणि आरती सर्क्युलॅरिटी लिमिटेड (एसीएल) यांनी बुधवारी केली.
नव्या संयुक्त उपक्रमांतून पुढील पाच वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत प्लास्टिक्स कचऱ्याद्वारे प्रति दिन ५०० टन पुनर्प्रक्रिया केलेली उत्पादने मिळविण्याचे आणि वार्षिक महसूल ५,००० कोटी रुपयांवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सुरुवात म्हणून हैदराबाद येथे प्रति दिन १०० टन उत्पादन क्षमता असलेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त प्रकल्पाच्या उभारणीवर काम सुरू झाले असून, पुढील सहा महिन्यांत त्यातून उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे, अशी री सस्टेनिबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक मसूद मलिक यांनी माहिती दिली. विविध स्रोतांतून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, तो विलग करून त्यातून पुनर्प्रक्रियेसाठी प्लास्टिक्स मिळविणे या कामांसाठी त्यांच्या कंपनीची विशेषज्ज्ञताच वापरात येणार आहे.
एसीएल ही विशेष रसायनांच्या क्षेत्रात चार दशकांचा वारसा असलेल्या आरती इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण अंंगिकृत उपकंपनी असून, तिचा या भागीदारीत ४९ टक्के वाटा, तर उर्वरित ५१ टक्के वाटा हा री सस्टेनिबिलिटीकडे असेल. हैदराबादनंतर, त्याच धर्तीचा उत्पादन प्रकल्प लवकरच महाराष्ट्रात आणि नंतर देशाच्या अन्य शहरात सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. उभयतांनी संयुक्त कंपनी १०० कोटींची भागभांडवली गुंतवणूक केली आहे.