स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या २० मे रोजी झालेल्या पहिल्याच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. एजंटस हे ग्राहक आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. एजंट्सना ग्राहकांना विनियामक तरतुदींसह व्यवस्थित मार्गदर्शन करता यावे, यासाठी विशिष्ठ प्रशिक्षणाच्या आधारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक करणारे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MahaRERA )हे देशातील पहिलेच प्राधिकरण आहे.
या निकालाचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की यात तब्बल ५ उमेदवारांनी ९०% गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. याशिवाय या यशस्वी उमेदवारांत ४०५ पैकी ३६ उमेदवार हे ६० वर्षांवरील आहेत. यातही ६ उमेदवार ७० वर्षांवरील असून, या सर्वांनी ७०% वर गुण मिळवले आहेत. यांच्यात मुंबईतील एस. एम. मालदे हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून ते ७४ वर्षांचे आहेत.
या यशस्वी ४०५ उमेदवारांत ३७ महिला उमेदवारही आहेत. गुणानुक्रमे संयुक्तपणे पहिल्या आलेल्यांत पुण्यातील गीता छाब्रिया या पहिल्या स्थानावर आहेत. २० मे रोजी राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर अशा १० ठिकाणी झालेल्या परीक्षेत अपेक्षित ४५७ पैकी ४२३ उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. महारेराने १० जानेवारी २३ च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे. तसेच सध्याच्या सुमारे ३९ हजार एजंटसनाही १ सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे.
स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.