सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच ३३ कोटी गॅस जोडण्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणीत करणारा दिवस असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात सिलिंडरमागे २०० रुपयांचे अनुदान मिळत राहील. सरकारने ७५ लाख अतिरिक्त पीएम उज्ज्वला जोडण्यांना देखील मंजुरी दिली आहे, यामुळे एकूण पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या १०.३५ कोटींपर्यंत पोहोचणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्विट केलं आहे.
मोदी लिहितात, “रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणित करणारा दिवस असतो. गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील भगिनींना दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. माझी प्रत्येक बहीण आनंदी, निरोगी, सुखी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
या निर्णयामुळे सरकारवर ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार
२०० रुपये प्रति सिलिंडरच्या अतिरिक्त सबसिडीला मान्यता देण्यात आली आहे, परंतु सबसिडीचा भार केवळ ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर (OMCs) पडणार नाही. या अनुदानाचा भारही सरकार उचलणार आहे. सरकारवर किती बोजा पडेल आणि ओएमसीवर किती बोजा पडेल, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे सरकारवर ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे समजतेय.