मुंबई : भारतीय भांडवली बाजारातील महाकाय कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या जून तिमाहीत निव्वळ नफ्यात ११ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १७,९५५ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा तो घसरून १६,०११ कोटींपर्यंत खाली आला आहे. प्रतिसमभाग उत्पन्न २६.५४ रुपयांवरून ते २३.६६ रुपयांवर आले आहे. कंपनीने या आधीच्या मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत १९,२९९ कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला होता.
हेही वाचा >>> ‘या’ भारतीयाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, दिसायला राजवाड्यापेक्षाही कमी नाही
कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या २.२२ लाख कोटी रुपयांवरून २.१ लाख कोटी रुपयांवर आला आहे. जानेवारी-मार्च २०२३ मध्ये तो २.१६ लाख कोटी रुपये होता. प्रामुख्याने खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि डिझेलची विक्री आणि उत्पादन यातील नफ्याचे प्रमाण कमी झाल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा >>> डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी ‘हेल्थ अँड ग्लो’चे केले अधिग्रहण; आता नायकासारख्या ब्रँडशी स्पर्धा करणार
नफ्यात ‘जिओ’चे योगदान ४,८६३ कोटींचे दूरसंचार व डिजिटल व्यवसाय एकवटलेल्या रिलायन्स जिओला सरलेल्या तिमाहीत ४,८६३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १२.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी वाढत २४,१२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान एप्रिल २०२३ अखेर जिओचा बाजारहिस्सा ३७.९ टक्क्यांवर पोहोचला असून सरलेल्या महिन्यात ३०.४ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.