मुंबईः बाजार भांडवलाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरुवारी १८,५४० कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तिमाही कामगिरीची घोषणा केली. वार्षिक तुलनेत नफ्यातील ७.४ टक्के वाढ एकंदर विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा सरस ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरलेल्या डिसेंबरअखेर तिमाहीत कंपनीचा एकंदर महसूलही वार्षिक तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून २,४३,८६५ कोटी रुपयांवर गेला आहे. रिलायन्सच्या पारंपरिक तेल ते रसायन (ओ२सी) व्यवसायातून महसूल ६ टक्क्यांनी वाढून १,४९,५९५ कोटी रुपये राहिला. तर वायू व संशोधन विभागाचा महसूल ५.२ टक्क्यांनी घसरला. त्या उलट जिओ प्लॅटफॉर्म्स विभागाचा एकंदर महसूल तब्बल १९.२ टक्क्यांनी वाढून ३८,७५० कोटी रुपयांवर गेला. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स या किराणा व्यवसाय विभागातून ८.८ टक्के वाढीसह ९०,३३३ कोटी रुपयांचा महसूल कंपनीने कमावला.

हेही वाचा >>> Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत

जागतिक ऊर्जा बाजारपेठेत दीर्घकाळ सुरू राहिलेल्या अस्थिरतेनंतरही, कंपनीच्या ओ२सी व्यवसायाने अंगभूत कणखरता दर्शविणारी कामगिरी केली, असे या तिमाही निकालासंबंधाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले. त्यांनी किराणा व्यवसायाच्या सशक्त कामगिरीचेही विशेष कौतुक केले.

शेअरच्या भावातील वाढ कशी राहिल?   

निकालांच्या घोषणेपूर्वी रिलायन्सचा शेअर गुरुवारी मुंबई शेअर बाजारात १.३१ टक्के वाढीसह १,२६८.७० वर बंद झाला. मागील सहा महिन्यांत शेअरचा भाव १९.११ टक्क्यांची घसरला आहे. तथापि अनेक दलाली पेढ्यांनी नव्याने केलेल्या विश्लेषणांत, कंपनीच्या शेअरने १,६५० रुपये ते १,६९० रुपयांची भाव पातळी गाठण्याचे अंदाज वर्तविले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries q3 results reliance industries q3 profit rises to rs 18540 crore print eco news zws