रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १८,९५१ कोटी रुपयांना निव्वळ नफा नोंदविला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली नसली तरी कंपनीचा सरलेल्या आर्थिक वर्षातील निव्वळ नफा मात्र ६९,६२१ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे सोमवारी सायंकाळी जाहीर निकालांनी स्पष्ट केले.
रिलायन्सने मागील वर्षी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १९,२९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घसरण झालेली आहे. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या आधीच्या तिमाहीमधील १७,२६५ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा वाढ झालेली आहे.
हेही वाचा >>> मसाल्यावरील बंदीच्या सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ६९,६२१ कोटी रुपयांचा आजपर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा मिळविला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ६६,७०२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यात आता वाढ झालेली आहे. तर आर्थिक वर्षात १० लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९.७४ लाख कोटी रुपये होता, त्यात या तिमाहीत २.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. कंपनीचा वार्षिक कर-पूर्व नफा देखील पहिल्यांदाच १ लाख कोटींपुढे म्हणजेच १,०४,७२७ कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी तिचा तेल-ते-रसायने (ओ२सी) हा पारंपरिक व्यवसाय हा मुख्यत्वे दुभती गाय ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे या व्यवसायाच्या नफ्यात वाढ यंदाही दिसून आली, तर किराणा विक्री व्यवसायाची (रिलायन्स रिटेल) मिळकत ही नवीन दालने उघडल्यावरही वाढली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने दूरसंचार व्यवसायांत नवीन ग्राहक जोडणी आणि वाढत्या डेटा वापराच्या माध्यमातून स्पर्धकांना मागे टाकल्याचे जिओ प्लॅटफॉर्म्सच्या निकालांनी स्पष्ट केले. जिओ प्लॅटफॉर्म्सने वार्षिक निव्वळ नफ्यात २० हजार कोटींचे, तर रिलायन्स रिटेलने १०,००० कोटींपेक्षा जास्त योगदान दिले आहे. दरम्यान कंपनीने प्रति समभाग १० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.