R Jio IPO Expected To Launch In Second Half Of 2025 : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओसाठी तयारी सुरू केलेल्या माहिती आहे. रिलायन्स जिओचा हा आयपीओ अंदाजे ३५ ते ४० हजार कोटींचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामध्ये गुंतवणूकदारांना ऑफर फॉर सेल आणि प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे आयपीओ खरेदी करता येणार आहे. रिलायन्स समुहाने २०२५ च्या उत्तरार्धात हा आयपीओ शेअर बाजारात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि जर ठरल्याप्रमाणे हा आयपीओ बाजारात आला तर तो भारतातील सर्वात मोठा आयपीओ असेल.
प्री-आयपीओ प्लेसमेंटसाठी प्राथमिक बोलणी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयपीओचा आकार मोठा असला तरी त्यासाठी पुरेशी मागणी असल्याने त्याला सब्सक्रिप्शन मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे बँकर्सचे म्हणणे आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटची रक्कम नव्या इश्यूच्या आकारावर अवलंबून असेल, असे गुंतवणूक बँकर्सनी सांगितले. ओएफएस आणि ताज्या इश्यूमधील विभाजनाचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रिलायन्स जिओ हे जिओ प्लॅटफॉर्म्स अंतर्गत येते. ज्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा सुमारे ३३ टक्के इतका हिस्सा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने ने २०२० मध्ये जवळपास १८ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, केकेआर, मुबादला आणि सिल्व्हर लेक यांना त्यांचे भागभांडवल विकले होते.
विविध ब्रोकरेजेसनी रिलायन्स जिओचे मूल्य अंदाजे १०० अब्ज डॉलर्स इतके असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे सूत्रांनी सांगितले की, कंपनीचे मूल्य १२० अब्ज डॉलर्स इतके जास्त असण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणुकीसाठी जिओ प्लॅटफॉर्म नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केंद्रस्थानी आहे, असा उल्लेखही बिझनेस लाइनच्या वृत्तात करण्यात आला आहे.
अलीकडेच जिओ प्लॅटफॉर्म्सने एआय भाषा मॉडेल्स विकसित करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान कंपनी एनव्हीडीया बरोबर भागिदारी केली आहे.
हे ही वाचा : ग्रामीण भारताच्या विकासाला लाभाची संधी; आयसीआयसीआय प्रु.चा रूरल अपॉर्च्युनिटीज फंड दाखल
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दूरसंचार, इंटरनेट आणि डिजीटल व्यवसायांसाठी ३ बिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे. याबरोबर आर जिओला उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मान्यता देखील मिळाली आहे.
ऑक्टोबर अखेरीस सुमारे ४६ कोटी ग्राहकांसह रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये टेलिकॉम सेवेचे शुल्क वाढवल्यापासून जिओने अनेक ग्राहक गमावले. मात्र, त्यानंतरही, त्यांनी ग्राहकांनी संख्या मोठ्या प्रमाणात कायम राखली आहे.