मुंबईः पारंपरिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायाच्या कमकुवत कामगिरीमुळे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जुलै-सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५ टक्क्यांची घट नोंदवली. देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेल्या कंपनीने सोमवारी आर्थिक कामगिरी जाहीर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्सचा एकत्रित निव्वळ नफा तिमाहीत १६,५६३ कोटी रुपये नोंदवण्यात आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण १७,३९४ कोटी रुपये होते. परिणामी कंपनीच्या प्रति समभाग मिळकतीतही (ईपीएस) वार्षिक तुलनेत २५.७१ रुपयांवरून, आता २४.४८ रुपये अशी घसरण झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायांनी स्थिर कामगिरी दर्शविली असताना, गुजरातमधील जामनगर येथील दुहेरी तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रमुख हिस्सा असलेल्या तेल-ते-रसायन (ओ२सी) व्यवसायाची नफाक्षमता २३.७ टक्के अशी लक्षणीय घटली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा २ टक्क्यांनी घसरून, ४३,९३४ कोटी रुपये झाला आहे.

हेही वाचा >>>तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? हे बाकीचे पैसे जातात कुठे?

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ग्राहकांनी खरेदीचा निर्णय लांबवल्याचा परिणाम रिलायन्स रिटेलच्या कमाईतही प्रतिबिंबीत झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत तिच्या परिचालन महसुलात ३.५३ टक्क्यांनी घट होऊन तो ६६,५०२ कोटी रुपयांवर सीमित राहिला आहे. करोत्तर नफा मात्र १.२८ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह २,८३६ कोटी रुपये झाला आहे.

कंपनीच्या दूरसंचार व्यवसायाने मात्र चमकदार कामगिरी नोंदवली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने उत्तम ग्राहक मिश्रण, डिजिटल सेवांमधील वाढ आणि दूरसंचार दरांमध्ये सुधारणा यामुळे वार्षिक तुलनेत महसुलात १७.८ टक्क्यांनी वाढ साधली असून, ते ६,५३९ कोटी रुपयांवर नेले आहे. जिओचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल दरमहा १९५.१ रुपये असा वाढला आहे.

तिमाहीतील ही कामगिरी डिजिटल सेवा व्यवसायातील मजबूत वाढ दर्शवते. यामुळे ओ२सी व्यवसायातील कमकुवत राहिलेल्या योगदानाच्या भरपाईस मदत झाली. जागतिक मागणी-पुरवठ्याच्या प्रतिकूल चक्राचा या पारंपरिक व्यवसायावर दिसून आलेला हा परिणाम आहे. तथापि वैविध्यपूर्ण व्यवसायाच्या एकत्रित क्षमतांची चमक या तिमाहीने पुन्हा एकदा दाखवून दिली. – मुकेश अंबानी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance quarterly net profit falls by 5 percent print eco news amy