मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजमधून ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट’ या नवीन बँकेतर वित्तीय कंपनीच्या विलगीकरणाला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीने मान्यता दिली, जिचे ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ या नव्या नामाभिधानासह लवकरच कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित आहे. रिलायन्सने शेअर बाजाराला शुक्रवारी याबद्दल माहिती दिली आणि या संदर्भात भागधारकांच्या मंजुरीसाठी २ मे २०२३ रोजी सभा निश्चित करण्यात आल्याचेही कळविले.
प्रस्तावित विलगीकरणाने मंजुरीचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी होऊन ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ ही नवीन कंपनी अस्तित्वात येईल. नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही आघाडीच्या बाजार मंचावर सूचीबद्ध केले जातील आणि रिलायन्सच्या विद्यमान भागधारकांना या कंपनीचे १:१ या प्रमाणात समभाग मिळू शकतील. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक समभागामागे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक समभाग मिळेल. या कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १,५३५.६ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला असून त्याची एकत्रित मालमत्ता सुमारे २७,९६४ कोटी रुपये होती.
ज्येष्ठ बँकर के. व्ही. कामथ हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे गैर-कार्यकारी अध्यक्ष असतील. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वित्तीय सेवा विभागाची तरल मालमत्ता (ट्रेझरी शेअर) संपादन करेल, जेणेकरून ग्राहक आणि व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुरेसे भांडवल तिला उपलब्ध होईल. याचबरोबर येत्या तीन वर्षात देयक प्रणाली (पेमेंट), ई-ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापनासह इतर वित्तीय सेवा क्षेत्रात कंपनी पाऊल ठेवणार आहे.
समभागांत ५ टक्क्यांची मूल्य तेजी
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विलगीकरणाच्या वृत्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग मुंबई शेअर बाजारात ४.२९ टक्क्यांनी म्हणजेच ९५.८० रुपयांनी वधारून २३३१.०५ रुपयांवर बंद झाला.