पीटीआय, नवी दिल्ली
अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) इंडिया कंपनीतील सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी असुरक्षित आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारे वातावरण कंपनीत होते का, याची चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल दहा दिवसांत सादर होणे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री मनुसख मांडविया यांनी सोमवारी दिली.

ईवाय इंडियातील ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) या सीए तरुणीचा मृत्यू झाला असून, तो कामाच्या अतिताणामुळे झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मांडविया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीतील कामाचे वातावरण असुरक्षित आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारे होते का, याची चौकशी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सुरू आहे. याबाबत राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल हाती आल्यानंतरच या प्रकरणी नेमकेपणाने बोलता येईल. आताच याबाबत कंपनीला दोषी ठरविणे चुकीचे आहे. चौकशी अहवाल आठवडाभरात अथवा १० दिवसांत मिळेल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

हेही वाचा >>>‘…तर ७५ टक्के युजर UPI पेमेंट करणं बंद करतील’, ताज्या सर्व्हेमधून समोर आले निष्कर्ष!

याआधी केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ॲनाच्या मृत्यूमुळे अतीव शोक झालेला आहे. या प्रकरणाची दखल स्वत:हून घेऊन कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू आहे. ॲनाला न्याय मिळवून दिला जाईल.