लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेने पात्र लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी केली आहे. नियमित किंवा सार्वत्रिक बँक होण्यासाठी किमान १,००० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह निर्दिष्ट निकषांची पूर्तता करणाऱ्या लघु वित्त बँकांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासह सुमारे डझनभर लघुवित्त बँकांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१४ मध्ये खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. मात्र तत्कालीन लघुवित्त बँकांचा व्यवसाय पसारा वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. नियमित बँक बनण्यासाठी लघुवित्त बँकेला मागील तिमाहीच्या अखेर (ऑडिट केलेले) किमान निव्वळ १,००० कोटींची संपत्ती असणे आवश्यक आहे आणि बँकेचे समभाग मान्यताप्राप्त बाजारमंचावर सूचिबद्ध केलेले असावेत, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये, रिझर्व्ह बँकेनेलघु वित्त बँकांना नियमित अथवा सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग प्रदान केला.
हेही वाचा >>>पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये त्याचा निव्वळ नफा आणि एकूण बुडीत कर्ज आणि निव्वळ बुडीत कर्ज अनुक्रमे ३ टक्के आणि १ टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. इतर अटींमध्ये सीआरएआर (भांडवल-जोखीम मालमत्ता प्रमाण) आवश्यकता आणि किमान पाच वर्षांची कामगिरीचा समाधानकारक असली पाहिजे.