वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वित्तीय क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) जबाबदार आणि नैतिक वापर आणि अवलंबाला चालना देणाऱ्या नियामक चौकटीची आखणी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आठ सदस्यांची उच्चस्तरीय समिती गुरुवारी नियुक्त केली.
डिसेंबरच्या सुरुवातीला पतधोरणा बैठकीपश्चात रिझर्व्ह बँकेने या समितीबाबत सूतोवाच केले होते. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आता विधिवत स्थापित करण्यात आली आहे. बँका, बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी), फिनटेक आणि देयक प्रणाली चालकांसह संपूर्ण वित्तीय क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा नैतिक वापर वाढावा, यासाठी नियामक चौकट या समितीकडून आखली जाणार आहे. या समितीत शिक्षण, उद्योग आणि प्रशासनांतील तज्ज्ञ व्यक्ती आहेत.
हेही वाचा – रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
हेही वाचा – पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
या समितीच्या सदस्यांमध्ये नासकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष, आयआयटी मद्रासमधील वाधवानी स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड एआय संस्थेचे प्रमुख बलरामन रवींद्रन, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह, ट्रायलिगल संस्थेतील भागीदार राहुल मथ्थन, एचडीएफसी बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अंजनी राठोड आणि मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कृत्रिम प्रज्ञा संशोधन विभागाचे प्रमुख हरी नागरालू यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या फिनटेक विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक सुवेंदू पती हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.