मुंबई : अंध:कारमय जगात भारतीय अर्थव्यवस्था एक आशेचा किरण आहे, असे नमूद करत रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाढीचा दर मात्र कपात करून, ६.८ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी मध्यवर्ती बँकेने जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहण्याचा कयास केला होता. जागतिक बँकेने दोन दिवसांपूर्वीच भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाजात ०.४० टक्क्यांनी सुधारून ६.९ टक्के राहण्याची आशा व्यक्त केली आहे, तर रिझव्‍‌र्ह बँकेचा ताजा कयास ०.२० टक्क्यांनी खालावणाऱ्या सुधारणेसह त्यापेक्षा कमी अनुमानाचा आहे. विकास दराच्या अंदाजात घट केली असली तरी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. 

महागाईबाबत चिंता कायम

चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाईचा दर अजूनही सहनशील पातळीच्या वर कायम असून तो निश्चित पातळीपर्यंत खाली आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक प्रयत्नशील आहे. अर्जुनाने केलेल्या डोळय़ाच्या लक्ष्यवेधाप्रमाणे बँकेचे महागाई नियंत्रणाकडे लक्ष असेल, असे दास म्हणाले. चालू वर्षांतील जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली येण्याची मध्यवर्ती बँकेने आशा व्यक्त केली आहे. खनिज तेलाचे दर प्रति पिंप सरासरी १०० डॉलरवर राहणे आणि समाधानकारक मॉन्सून गृहीत धरून पुढील आर्थिक वर्षांतील पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत महागाईदर अनुक्रमे ५ आणि ५.४ टक्के राहील, असे सूतोवाच केले आहे.

अमेरिकेच्या ‘फेड’चा दर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे, परंतु आमची धोरणे प्रामुख्याने देशांतर्गत घटकांद्वारे निर्धारित केली जातात. आम्ही त्यासाठी ‘फेड’च्या निर्णयाकडे पाहत नसतो.. अर्जुनाने केलेल्या डोळय़ाच्या लक्ष्यवेधाप्रमाणे आमचे महागाई नियंत्रणाकडे लक्ष असेल. 

– शक्तिकांत दास, रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve bank cuts growth forecast gdp reserve bank governor shaktikanta das ysh