लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी रिझर्व्ह बँकेने मंगळवारी खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेवर एकत्रित २.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आणि व्याज दरासंबंधाने काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेला १.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने या संबंधाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, ठेवींवरील व्याजदर, केवायसी नियम आणि तारणमुक्त कृषी कर्ज या संबंधी नियम पालनांत बँकेकडून हयगय दिसून आली आहे. त्याचप्रमाणे, ठेवीवरील व्याज दर, बँकेद्वारे नियुक्त वसुली एजंट आणि ग्राहक सेवा यासंबंधाने काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला १ कोटी रुपयांचा दंड मध्यवर्ती बँकेने ठोठावल्याचे मंगळवारीच प्रसृत दुसऱ्या निवेदनांत म्हटले आहे.
ॲक्सिस बँकेने काही प्रकरणांमध्ये १.६० लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी कर्जदाराकडे जामीन, तारण घेतल्याचे आढळून आले. तर एचडीएफसी बँकेने ठेवी मिळविताना, काही ठेवीदारांना २५० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या भेटवस्तू (जीवन विमा संरक्षणासाठी प्रथम वर्षाचा हप्ता भरण्याच्या स्वरूपात) दिल्या. शिवाय ग्राहकांना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ वाजण्यापूर्वी संपर्क साधला जाणार नाही, या नियमाच्या पालनात बँकेकडून हयगय झाल्याचे पर्यवेक्षणांत आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. दोन्ही बँकांनी काही अपात्र घटकांच्या नावे खाती उघडून ठेवी मिळविल्याचेही उघडकीस आले आहे.
© The Indian Express (P) Ltd