नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून मनमोहन सिंग यांच्या योगदानाने अमीट छाप सोडली आहे, अशी प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहताना दिली. माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची १९८२ ते १९८५ दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही कारकीर्द राहिली आहे.
सिंग यांनी १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ८.५ टक्क्यांच्या जवळ होती. चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या तुलनेत ३.५ टक्क्यांपाशी होती. देशाकडे केवळ दोन आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेल इतकेच परकीय चलन शिल्लक होते. भारतीय अर्थव्यवस्था गंभीर संकटातून मार्गक्रमण करत असताना सिंग यांनी सादर केलेल्या १९९१-९२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे नवे आर्थिक युग सुरू झाले. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा वळण बिंदू ठरला. ज्या माध्यमातून परवाना राज रद्द होण्यासह, अनेक क्षेत्रे खासगी कंपन्या आणि परदेशी कंपन्यांसाठी खुली करणाऱ्या ठळक आर्थिक सुधारणांचे पर्व सुरू झाले. ज्यायोगे परदेशी भांडवलाचा प्रवाह वाढीला लागला.
हेही वाचा >>> चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्यांवर
नव्या, उदारमतवादी भारताची कल्पना मांडणाऱ्या दिग्गजांपैकी एक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला जागतिक पातळीवर एक वेगळ्या स्थानावर नेऊन पोहोचविले. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे जगभरात त्यांना आदर मिळाला. नम्र स्वभाव, वैयक्तिक मूल्यांबाबत काटेकोर असलेले सिंग हे त्यांच्या दूरदर्शी विचार आणि खोल अंतर्दृष्टीसाठी नेहमी स्मरणात राहतील. – एन चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स
हेही वाचा >>> परकीय चलन गंगाजळी घटून सात महिन्यांच्या नीचांकी
बोलणे मृदू परंतु दृढनिश्चयी कृतीतून अभूतपूर्व प्रगती साधणारे एक अद्वितीय नेते राहिलेले डॉ. सिंग यांचे जीवन म्हणजे नेतृत्वगुण, नम्रता आणि राष्ट्रसेवेचा सर्वोत्कृष्ट वस्तुपाठच आहे. १९९१ मध्ये त्यांनी सुरू केलेल्या परिवर्तनात्मक सुधारणा पर्वासाठी इतिहासात त्यांना मानाचे स्थान राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना ते प्रेरणा देत राहील. गौतम अदानी, अदानी समूहाचे अध्यक्ष
सिंग यांच्या निधनाने देशाने एक मोठा नेता आणि उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ गमावला. त्यांचे सर्वात मोठे योगदान हे युग-परिवर्तनकारी १९९१ च्या सुधारणा हे असून, ज्यांनी भारताच्या बहु-दशकीय आर्थिक भरभराटीला चालना दिली आणि भारतीयांसाठी शक्यतांचा एक मोठा पट खुला करून दिला. – कुमार मंगलम बिर्ला, अध्यक्ष आदित्य बिर्ला समूह
सज्जन, अभ्यासू आणि मूल्यावर आधारित राजकारणी असाच मनमोहन सिंग यांचा लौकिक राहिला. नरसिंह राव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताच्या आर्थिक विकासाचा एक मजबूत आणि टिकाऊ पाया घातला. ज्याबद्दल प्रत्येक भारतीयाने या असामान्य व्यक्तीचे आभार मानले पाहिजेत. नारायण मूर्ती, इन्फोसिसचे संस्थापक
आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, ज्याने आपल्या बुद्धी, लाघव आणि सचोटीने आधुनिक भारताला आकार दिला. एक असा नेता जो मौखिक शब्दांपेक्षा आपल्या कृतीलाच मोठ्याने बोलू देत होता. आनंद महिंद्र, अध्यक्ष महिंद्र समूह
भारताच्या आर्थिक उदारीकरणामागील द्रष्टे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. मार्ग दाखविणारा दीपस्तंभच आम्हाला सोडून गेला. – सज्जन जिंदल, जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष
कुशाग्र बुद्धी, जन्मजात नम्रता आणि वैयक्तिक सचोटी हे राजकारणात क्वचितच आढळणारे गुण सिंग यांच्याकडे होते. त्यांच्या या वेगळेपणामुळे ते कायम स्मरणात राहतील. केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील ते एक महान राजकीय नेते होते. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला सिंग यांनी सुरू केलेल्या सुधारणांमुळे भारताला विकसनशील राष्ट्र ते जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनता आले. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नेतृत्व, विज्ञान, संशोधन आणि धोरणनिर्मिती या क्षेत्रांत आज जगभरात देशाची मान उंचावली आहे. ही प्रतिभा आणि सर्जनशीलता नव्वदच्या दशकातील परिवर्तनामुळे घडून आली आहे. – कौशिक बसू, जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ
सिंग यांच्या १९९१ च्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी कलाटणी दिली. ज्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आर्थिक जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वातील त्या दूरदर्शी सुधारणांमुळे आमच्यासारख्या असंख्य तरुण अर्थतज्ज्ञांना प्रेरणा मिळाली. – गीता गोपीनाथ, उपव्यवस्थापकीय संचालक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)
पांडित्य, नम्रता आणि मृदुभाषेमुळे डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेक लोकांना स्वतःसोबत जोडले. यात माँटेक सिंग अहलुवालिया, सी रंगराजन आणि राकेश मोहन यांसारख्या अर्थतज्ज्ञांचा समावेश आहे. भारत काय असू शकतो याची उत्तम दृष्टी असलेले, राजकीयदृष्ट्या काय शक्य आहे याची उत्तम जाण असलेले ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी राबविलेले उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांनी आजच्या आधुनिक भारताचा पाया रचला. – रघुराम राजन, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तरुणांना सरकारमध्ये सामील होण्यासाठी आणि धोरणनिर्मितीमध्ये भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहन देत असत. शिवाय तरुणांनी दिलेल्या कल्पनांना ते स्वीकारत देखील होते. धोरणनिर्मितीत योगदानासाठी त्यांनी मॉन्टेक सिंग अहलुवालिया, शंकर आचार्य आणि अरविंद वीरमनी या सारख्या तरुणांच्या प्रतिभेला खूप प्रोत्साहन दिले आणि त्यांना प्रशासनात सहभागी होण्यास प्रवृत्त केले. – राकेश मोहन, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे माजी सदस्य