पीटीआय, नवी दिल्ली
पुढील काही काळ जादा व्याजदर कायम राहणार आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अतिशय सावध पवित्रा घेतला असून, त्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
कौटिल्य आर्थिक परिषदेत दास बोलत होते. दास म्हणाले की, व्याजदर हे जास्त राहणार आहेत. ते किती काळ जास्त राहतील हे येणारा काळ आणि भविष्यात जगामध्ये घडणाऱ्या घडामोडी ठरवतील. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबत आम्ही अधिक दक्ष आहोत. यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची आमची तयारी आहे. आम्हाला महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे.
हेही वाचा… २ हजारांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर आता RBI चा १००० रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मे २०२२ पासून अडीच टक्क्याने वाढ केली असून, ते ६.५ टक्के या उच्चांकी पातळीवर आहेत. महागाईची पातळी अद्याप जास्त आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.१४ टक्के या पातळीवर पोहोचला. त्यात घसरण होऊन सप्टेंबरमध्ये तो ५ टक्क्यांवर आला. केंद्र सरकारने किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेला सोपविली आहे. त्यात अधिक आणि उणे २ टक्के गृहित धरले जातात.
अस्थिर वातावरणात रुपया स्थिर
विद्यमान कॅलेंडर वर्षात १ जानेवारीपासून आत्तापर्यंत रुपयाची वाटचाल बघितल्यास, त्यात केवळ ०.६ टक्क्यांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे त्याच कालावधीत अमेरिकी डॉलरचे ३ टक्क्यांनी मूल्यवर्धन झाले आहे. चलन बाजारात अस्थिरता असून देखील त्यातुलनेत रुपयाची कामगिरी चांगली राहिली आहे. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्यासाठी परकीय चलन बाजारात वेळोवेळी उपाययोजना केल्या जात असून योग्यवेळी हस्तक्षेप देखील केला होईल, असेही शक्तिकांत दास म्हणाले. गेल्या पंधरवड्यात, अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर वाढला आहे, ज्याचा जगभरातील इतर अर्थव्यवस्थांवर व्यापक परिणाम झाला आहे. त्यापरिणामी डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम आपल्यावर होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. तरीही भारतातील महागाईचा विचार करता प्रामुख्याने पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा भाव महत्वाचा ठरतो. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक