मुंबई : रिझर्व्ह बँकेने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर सरासरी ४.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर वर्ष २०२४-२५ साठी ४.८ टक्के महागाई दराचा अंदाज तिने कायम ठेवला आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरच्या पतधोरणात, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, खरीप हंगामात कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. फळे आणि भाज्यांच्या किमतीत घट झाली असून रब्बी हंगामातही पीक उत्पादन दमदार राहण्याच्या शक्यतेमुळे पुरवठ्याच्या बाजूने धक्का बसण्याची शक्यता कमी आहे. परिणामी खाद्यान्न महागाईचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे नजीकच्या काळात महागाई दर नरमलेलाच राहण्याची आशा आहे.
जागतिक वित्तीय बाजारपेठेतील सततची अनिश्चितता, ऊर्जा किमतीतील अस्थिरता आणि प्रतिकूल हवामान घटनांमुळे महागाईच्या अंगाने चढउताराचे धोके निर्माण होतात, असे ते म्हणाले. या सर्व बाबींचा विचार करता, चालू २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी महागाई दर ४.८ टक्के आणि जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत तो ४.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षी मान्सून सामान्य राहणार असल्याचे गृहीत धरल्यास, २०२५-२६ मध्ये किरकोळ महागाई दर ४.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे, पहिल्या तिमाहीत तो ४.५ टक्के; दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के; तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले सरलेल्या डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशकांवर आधारित किरकोळ महागाई दर ५.२२ टक्के असा चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. प्रामुख्याने भाज्यांसह अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे त्यात घट झाली.