मुंबई: रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी येत्या सोमवारी, २७ जानेवारीला नियोजित बैठकीनिमित्त पहिल्यांदाच संवाद साधणार आहेत. बँकांचा पतविस्तार, ठेवींमधील वाढ, यंत्रणेतील संभाव्य ताण, डिजिटल फसवणूक आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा या बाबी बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Raghuram Rajan : डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाबाबत रघुराम राजन यांनी दिला महत्त्वाचा इशारा
नवीन गव्हर्नरांसोबत बँक प्रमुखांची ही पहिलीच औपचारिक चर्चा असल्याने, या उद्योग क्षेत्राबद्दलच्या त्यांच्या अपेक्षादेखील समजून घेतल्या जातील. तसेच बँकिंग उद्योगावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींबाबत त्यांना माहिती देण्यात येईल, असे एका बँकेच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. देशाचे माजी महसूल सचिव आणि १९९० च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले मल्होत्रा यांनी सरलेल्या ११ डिसेंबरपासून तीन वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आहे.