मुंबई : चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज रिझर्व्ह बँकेने ४.५ टक्क्यांवरून वाढवून ४.८ टक्क्यांवर नेला आहे. खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्याने तिसऱ्या महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुकवारी दिली.
पतधोरण समितीच्या बैठकीनंतर बोलताना दास म्हणाले की, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईच्या दरात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठी वाढ झाली. खाद्यवस्तूंच्या किमतीतील वाढ याला कारणीभूत ठरली. इंधनाच्या दरात घसरण सुरू असून, त्यात ऑक्टोबरमध्ये सलग १४ व्या महिन्यांत घट नोंदविण्यात आली. नजीकच्या काळात काही वस्तूंच्या किमतीत घट झाली असली ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर अधिक आहे. यामुळे तिसऱ्या तिमाहीत महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाईचा दर तिसऱ्या तिमाहीत ५.७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.५ टक्के तर चालू आर्थिक वर्षासाठी ४.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमधील पतधोरणात चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा दर ४.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता. आता हा अंदाज वाढवून ४.८ टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर जुलै ते ऑगस्ट तिमाहीत सरासरी ३.६ टक्के होता. तो नंतर वाढून सप्टेंबरमध्ये ५.५ टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षातील सप्टेंबरनंतरची ही किरकोळ महागाई दराची उच्चांकी पातळी ठरली आहे.
खरीप हंगामातील कृषी उत्पादन विक्रमी झाले असल्याने तांदूळ आणि तूर डाळीच्या वाढलेल्या किमतीतून दिलासा मिळाला आहे. हिवाळ्यात भाज्यांच्या वाढलेल्या किमती कमी होतील. सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असून, त्यावर मात्र बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक