मुंबई : जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून ऑक्टोबर ६० टन सोने खरेदी करण्यात आली आहे, त्यापैकी २७ टन सोने रिझर्व्ह बँकेने खरेदी केले आहे, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने गुरुवारी दिली. रिझर्व्ह बँकेने विद्यमान कॅलेंडर वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत ७७ टन सोन्याची खरेदी केली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत यंदा मध्यवर्ती बँकेने पाचपट अधिक सोने खरेदी केली आहे. या खरेदीमुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा आता ८८२ टनांवर पोहोचला आहे, ज्यापैकी ५१० टन सोने भारतात रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत सुरक्षित आहे.
हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेकडून धोरण नरमाईची आशा, ‘सेन्सेक्स’मध्ये ८०० अंशांची तेजी
उदयोन्मुख देशांमधील तुर्कीये आणि पोलंडच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक सोने खरेदी केली आहे, त्यांनी जानेवारी-ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये अनुक्रमे ७२ टन आणि ६९ टन सोन्याची भर घातली आहे. या वर्षी नोंदवलेल्या एकूण जागतिक निव्वळ खरेदीत या तीन देशांच्या मध्यवर्ती बँकांचा वाटा ६० टक्के राहिला आहे. दरम्यान, आकडेवारीवरून पुढे असे दिसून आले की, सेंट्रल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ तुर्कीयेने १७ टनांची भर घातली, ज्यामुळे ऑक्टोबर हा निव्वळ खरेदीचा सलग १७वा महिना ठरला आहे. नॅशनल बँक ऑफ पोलंडने ऑक्टोबरमध्ये ८ टन निव्वळ खरेदी नोंदवली, हा खरेदीचा सलग सातवा महिना आहे.