पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असताना देशांतर्गत आघाडीवर महागाई दराने मोठा दिलासा दिला आहे. भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या भावात घसरण झाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाई दरात घसरण होऊन तो ३.३४ टक्क्यांवर आला. गेल्या सहा वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. दरम्यान, घाऊक महागाईच्या दरातही मार्चमध्ये घसरण नोंदविण्यात आली असून तो सहा महिन्यांच्या नीचांकी पोहोचला आहे.

किरकोळ किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ३.६१ टक्के होता. मार्चमध्ये यात घसरण होऊन तो ३.३४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा दर ४.८५ टक्के होता. यंदा मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे.

याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये हा दर ३.२८ टक्के या नीचांकी पातळीवर नोंदविण्यात आला होता. मार्च महिन्यात खाद्यावस्तूंच्या महागाईचा दर २.६९ टक्के आहे. तो फेब्रुवारीमध्ये ३.७५ टक्के आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये ८.५२ टक्के होता.