रिझर्व्ह बॅंकेच्या अनेक प्रयत्नांनंतरही देशात महागाई सातत्याने वाढते आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हा दर ५.५ टक्के होता. मात्र, या महिन्यात महागाईने मागच्या १४ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. यामुळे खाद्यपदार्थ, विशेषत: भाज्या आणि उत्पादित खाद्य वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ज्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्पादित खाद्य वस्तूंचा महागाई दर ९.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबर महिन्यात ८.३६ नोंदवला गेला. तर भाज्यांचा महागाई दर ४२.१८ टक्क्यांवर वर पोहोचला आहे. हा दर सप्टेंबर महिन्यात ३५.९९ टक्के नोंदवण्यात आला. याशिवाय फळांचा महागाई दरही वाढला आहे. जो सप्टेंबर महिन्यातील ७.६५ टक्क्यांहून ८.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा – LPG Gas Cylinder : ऐन दिवाळीत व्यावसायिक सिलिंडर ६२ रुपयांनी महाग, घरगुती सिलिंडरच्या दरांची स्थिती काय?

याशिवाय कडधान्यांच्या महागाई दरातही किंचीत वाढ बघायला मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यातील ६.८४ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात हा दर ६.९४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तसेच मास आणि माशांचा महागाई दरातही २.६६ टक्क्यांवरून ३.१७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. महत्त्वाच्या म्हणजे घरांच्या महागाईचा दरही सप्टेंबरमधील २.७८ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये २.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

“भाजीपाला आणि खाद्य तेलाच्या दरांत मोठी वाढ होणं हा चिंतेचा विषय आहे. देशाच्या काही भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. याशिवाय आयात शुल्कात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. या किंमती सरकारने स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे” अशी प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी दिली.

हेही वाचा – खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला

महत्त्वाचे म्हणजे दीड वर्षांत महागाईचा दराने विक्रमी उच्चांक गाठल्याने डिसेंबरमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरणांच्या बैठकीत (एमपीसी) रेपो दर जैसे थे राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. गेल्या काही बैठकांपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम आहे. अशातच आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत यात कोणता बदल सगळ्याचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail inflation rate 14 month high record 6 21 percent know in details spb