नवी दिल्ली : किरकोळ महागाई दर अर्थात चलनवाढ डिसेंबरमध्ये ५.२२ टक्के या चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर ओसरला असून, याला प्रामुख्याने खाद्यान्नांच्या किमतीतील घसरण कारणीभूत ठरल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून दिसून आले.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या नोव्हेंबर महिन्यात ५.४८ टक्के होता. त्यात घट होऊन तो डिसेंबरमध्ये तो ५.२२ टक्के नोंदविला गेला. आधीच्या वर्षी म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये हा दर ५.६९ टक्के होता.
सरलेल्या महिन्यात खाद्यवस्तूंची किंमतवाढ कमी होऊन ८.३९ टक्क्यांवर आली आहे. नोव्हेंबरमध्ये खाद्यान्न किंमतवाढ ९.०४ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ती ९.५३ टक्के होती. किरकोळ महागाई आणि सर्वाधिक तापदायक ठरलेल्या खाद्यान्नांच्या किमतीही सरलेल्या डिसेंबरमध्ये चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दरासंबंधी अंदाजात ४.५ वरून वाढवून ४.८ टक्क्यांपर्यंत वाढ करणारी सुधारणा केली. ग्राहक किंमत निर्देशांकात निम्म्याहून अधिक भारमान असणाऱ्या खाद्यान्नांच्या किमतीचा दबाव असल्याने महागाई दर डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत जास्त राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तविली होती, प्रत्यक्षात त्यात उतार दिसून आला आहे.
चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर जुलै ते ऑगस्टदरम्यान सरासरी ३.६ टक्के होता. नंतर सप्टेंबरमध्ये तो ५.५ टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्क्यांची चिंताजनक पातळी त्याने गाठली होती.

भाज्यांच्या किमतीत २६.५४ टक्के भडका

गेले काही महिने सर्वाधिक अस्थिर राहिलेल्या आणि खाद्यान्न महागाई वाढीस कारणीभूत ठरलेल्या भाज्यांच्या किमती सरलेल्या डिसेंबरमध्येही वार्षिक तुलनेत २६.५४ टक्क्यांनी कडाडल्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यात २९.३३ टक्क्यांची, तर ऑक्टोबरमध्ये तब्बल ४२.१८ टक्क्यांनी झालेली वाढ पाहता, किमतवाढीचे प्रमाण काहीसे ओसरले असले तरी ते अद्याप तापदायकच असल्याचे उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले. बरोबरीने तृणधान्यांच्या किमती नोव्हेंबरमधील ६.८८ टक्क्यांच्या तुलनेत, डिसेंबरमध्ये ६.५ टक्के, तर डाळींच्या किमतीतील वाढ नोव्हेंबरमधील ५.४१ टक्क्यांच्या तुलनेत ३.८३ टक्क्यांपर्यंत नरमल्याचे दिसून आले.

फेब्रुवारीत व्याजदर कपात धूसर

चलनवाढीचा दर ५ टक्क्यांहून अधिक राहिल्याने, फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कपातीची शक्यता जवळपास मावळली आहे. तथापि, खाद्यान्नांच्या, मुख्यतः भाज्यांच्या संथावलेल्या किमती पाहता, पतधोरण निर्धारण समितीतील काही सदस्य त्या बैठकीपासून कपातचक्र सुरू करण्याबाबत आग्रही दिसतील आणि अर्थवृद्धीला पाठबळ देण्याच्या बाजूने कौल देऊ शकतील, असे मत पतमानांकन संस्था इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केले. 

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail inflation rate at 5 22 percent in december print eco news zws