पीटीआय, नवी दिल्ली
किरकोळ महागाई दराने सरलेल्या डिसेंबर महिन्यात चार महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली असून, तो ५.६९ टक्क्यांवर पोहोचल्याचे शुक्रवारी सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाज्यांच्या किमती कडाडल्याने ही वाढ आहे.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सामान्यांच्या रोजच्या ताटात वाढल्या जाणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला घटकांमधील किंमतवाढ सरलेल्या डिसेंबरमध्ये ९.५३ टक्क्यांची पातळी गाठणारी आहे, जी मागील महिन्यात ८.७ टक्क्यांवर आणि गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये ४.१९ टक्क्यांवर होती. किरकोळ किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दरात अन्नधान्य घटकाचे योगदान निम्म्याहून अधिक असल्याने, डिसेंबरमधील महागाईचा दर ५.६९ टक्क्यांच्या पातळीवर गेला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टॉमेटोसह भाज्यांमधील किंमतवाढ ही वार्षिक आधारावर २७.६४ टक्के, त्यानंतर डाळींमधील किंमतवाढीची पातळीही २०.७३ टक्के आणि मसाल्यांच्या किंमतीतील वाढ १९.६९ टक्के सरलेल्या डिसेंबरमध्ये नोंदवली गेली. तेल आणि मेद घटकांच्या किमती मात्र घटून १४.६९ टक्के पातळीवर उतरल्या.
किरकोळ महागाई दर आधीच्या नोव्हेंबर महिन्यात ५.५५ टक्के, तर गेल्या वर्षी याच महिन्यांत म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्के होता. महिन्याच्या सुरुवातीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अर्थविश्लेषकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात किरकोळ महागाई दर ५.८७ टक्के राहण्याचा सरासरी अंदाज वर्तविण्यात आला होता. शिवाय, रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमधील बैठकी पश्चात नंतरच्या दोन महिन्यांत (नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये) किरकोळ महागाई दर चढा राहण्याचेच अनुमान वर्तविले होते.
गव्हर्नर दास यांचा यापूर्वीच इशारा
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आगामी महिन्यांत खाद्यवस्तूंच्या अनिश्चित किमतीमुळे महागाई वाढण्याचा इशारा दिला होता. रब्बी हंगामातील गहू, मसाले आणि डाळी यांच्या पेरण्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. जागतिक पातळीवर साखरेच्या भावात होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. आता खाद्यवस्तूंमुळे महागाई दरात वाढ झाल्याने दास यांचा इशारा खरा ठरल्याचे समोर आले आहे.
दिल्लीला नीचांकी झळ
किरकोळ महागाईची झळ ही ग्रामीण ग्राहकांपेक्षा शहरी ग्राहकांना अधिक सोसावी लागली असल्याचे ‘एनएसओ’कडून डिसेंबर २०२३ साठी संकलित आकडेवारी सांगते. तथापि राज्यवार परिणाम जोखायचा झाल्यास दिल्लीत तिची झळ सर्वात कमी म्हणजे अवघी २.९५ टक्के, तर ओडिशातील नागरिकांसाठी मात्र ती ८.७३ टक्के अशी सर्वाधिक जाचक ठरली.