मुंबई: ॲक्सिस म्युच्युअल फंडाने त्याच्या काही निवडक फंडाच्या ग्रोथ पर्यायांतर्गत ‘आत्मनिर्भर एसआयपी’ ही अनोखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत, गुंतवणूकदार ८, १२, १५, २०, २५, किंवा ३० वर्षांसाठी ‘एसआयपी’ची नोंदणी करू शकतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार जमलेल्या रकमेतून दरमहा निश्चित रक्कम ‘एसडब्ल्यूपी’च्या माध्यमातून गुंतवणूक काढू शकतो.
हेही वाचा >>> खाद्यतेल वर्षभर स्वस्त; आयातीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ
‘एसआयपी’ कालावधी जर आठ वर्षांचा असेल, तर ‘एसआयपी’इतकीच रक्कम दरमहा गुंतवणूकदार मिळवू शकेल. तर १०, १२, १५, २०, आणि २५ वर्षे कालावधीसाठी नोंदविलेल्या ‘एसआयपी’ रकमेतून अनुक्रमे दुप्पट, तिप्पट, पाच पट, आठ पट आणि बारा पट रक्कम दरमहा काढता येईल. ॲक्सिस लॉंगटर्म इक्विटी आणि इंडेक्स फंड वगळता सर्व समभाग गुंतवणूक करणारे फंड ‘आत्मनिर्भर एसआयपी’साठी पात्र आहेत. विद्यमान एसआयपीला ‘आत्मनिर्भर एसआयपी’मध्ये रूपांतरित केले जाऊ शकत नाही, तर ‘आत्मनिर्भर एसआयपी’ ही नवीन खाते (फोलिओ) उघडूनच तयार केली जाईल. हे गुंतवणूकदारस्नेही उत्पादन असून त्याचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना आर्थिक स्वातंत्र्य बहाल करणे हे आहे. दीर्घावधीत महागाईवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणून ही सुविधा मदतकारक ठरेल,’ अशी प्रतिक्रिया ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य व्यवसाय अधिकारी राघव अय्यंगार यांनी दिली.