वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेवर उपाय म्हणून सोन्याच्या साठ्यात गत वर्षभरात वाढ केल्याचे उपलब्ध आकडेवारी दर्शविते. मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २० मार्च २०२० पर्यंत देशाच्या एकूण परकीय चलनसाठ्यात सोन्याचे प्रमाण सुमारे ६ टक्के म्हणजे त्याच्या मूल्यानुसार २.०९ लाख कोटी रुपये होते. तर २४ मार्च २०२३ पर्यंत ते ७.८५ टक्क्यांपर्यंत वधारले आहे. म्हणजेच ३.७५ लाख कोटी रुपये मूल्याच्या सोन्याचा परकीय चलन गंगाजळीत समावेश केला आहे.
विश्लेषकांच्या मते, करोनानंतर जगातील बहुतांश बँकांनी सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यास सुरुवात केली. जागतिक महागाईचा उसळलेला आगडोंब आणि व्याजदर चढउतारांच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँका अधिकाधिक जोखीम-दक्ष बनल्याने त्या अक्षय्य मूल्य असलेल्या सोन्याचा आश्रय घेत आहेत. रिझर्व्ह बँकेनेदेखील तोच मार्ग अनुसरताना, सुवर्ण संचय वाढवत नेला आहे. ‘जागतिक सुवर्ण परिषद’ अर्थात ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या आकडेवारीनुसार, मध्यवर्ती बँकांनी २०२२ मध्ये त्यांच्या सोन्याच्या साठ्यात ७० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचे १,१३६ टन सोने खरेदी केले आहे, जे १९६७ नंतरचे खरेदीचे सर्वोच्च प्रमाण आहे. सोने हे सीमांचे बंधन नसलेल्या चलनासारखे आहे, म्हणजेच कोणत्याही देशात त्याला मान्यता असल्याने जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात ते एक सुरक्षित मालमत्तेचे साधन ठरते.
दुसरीकडे, करोना महासाथ सुरू झाल्यापासून मार्च २०२२ नंतर परकीय चलन गंगाजळीमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मध्यवर्ती बँकेने घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी परदेशी चलन खर्चून रुपयाला मोठ्या घसरणीतून सावरले. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यामुळे २०२२ च्या उत्तरार्धात गंगाजळी पुन्हा वाढली. २०२२ मध्ये, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात १० टक्के घसरण झाली आणि त्याने प्रथमच प्रति डॉलर ८३ रुपयांची नीचांकी पातळी गाठली.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारताची परकीय चलन गंगाजळी २० मार्च २०२० रोजी ३२.८३ लाख कोटी रुपयांच्या पातळीवरून, ११ मार्च २०२२ रोजी ४२.४५ लाख कोटी रुपयांवर गेली. मात्र २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ती ३९.८१ लाख कोटी रुपयांवर घसरली. मात्र त्यांनतर त्यात पुन्हा वाढ होऊन ती २४ मार्च २०२३ पर्यंत ४२.०४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
परकीय चलन गंगाजळीतील सुवर्णसाठा
तारीख मूल्य (लाख कोटी) डॉलरमध्ये (कोटी)
२० मार्च २०२० २.०९ २,७८५.६
१९ मार्च २०२१ २.५१ ३,४६८.१
१८ मार्च २०२२ ३.१८ ४,२०१.१
२४ मार्च २०२३ ३.७५ ४,५४८.०