नवी दिल्ली- पेटीएमची पितृकंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ६११ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. कंपनीवर परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ईडीच्या विशेष संचालकांनी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वन ९७ कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि पेटीएमसह इतर उपकंपन्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस आहे. कंपनीने सिंगापूरमध्ये परकीय गुंतवणूक करून त्याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेला न दिल्याचे तपासात समोर आले आहे. कंपनीने परदेशात उपकंपनी स्थापन करण्यासाठी ही गुंतवणूक केली होती. याचबरोबर परकीय गुंतवणूकदारांकडून कंपनीने थेट परकीय गुंतवणूक स्वीकारली असून, त्यासाठी देखील रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असे नोटिशीत म्हटले आहे.
ईडीने नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, वन ९७ कम्युनिकेशन्सची भारतातील उपकपंनी लिटल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेडने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न करता थेट परकीय गुंतवणूक स्वीकारली आहे. याचबरोबर दुसरी उपकंपनी नीअरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने थेट परकीय गुंतवणुकीची माहिती योग्य मुदतीत रिझर्व्ह बँकेला सादर केली नाही.
प्रतिसादादाखल पेटीएमने, ‘फेमा’चे उल्लंघन केल्याचा आरोप असणारी ईडीची नोटीस मिळाल्याचे म्हटले आहे. वन ९७ कम्युनिकेशन्स आणि तिच्या दोन उपकंपन्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन उपकंपन्या वन ९७ कम्युनिकेशन्सच्या ताब्यात येण्याआधीचे हे उल्लंघन आहे. या दोन्ही उपकंपन्या २०१७ मध्ये आमच्या संपादित करण्यात आल्या असल्याचा पेटीएमचा दावा आहे.