मुंबई: एकात्मिक विद्युतीकरण सेवा आणि आगप्रतिबंधक उपाययोजनांच्या क्षेत्रात कार्यरत, रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने व्यवसाय वाढीसाठी नियोजन आखले, त्यासाठी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. मुंबईस्थित या कंपनीकडून संपूर्ण गत दशकभरापासून देशभरात, औद्योगिक आस्थापने, गोदाम, वाणिज्य संकुले, मॉल आणि सिनेगृहांमध्ये इलेक्ट्रिकल उपाय, इलेक्ट्रिकल पॅनल्स, आग प्रतिबंधक प्रणाली, डेटा आणि व्हॉइस केबलिंग, तसेच सौरऊर्जा ईपीसी प्रकल्पांचे कार्यान्वयन करण्यासह, त्यांच्या देखभालीची कामेही पाहिली जात आहेत.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 11 March 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात स्वस्त की महाग, जाणून घ्या…
रुपेश लक्ष्मण कासवकर आणि नितीन इंद्रकुमार आहेर यांनी प्रवर्तित केलेल्या या कंपनीकडून सध्या ४० कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ३६.४२ कोटी रुपयांच्या महसुलावर, ३.०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील तीन वर्षांत कंपनीच्या महसुलात ३३.४ टक्के दराने वाढ झाली आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या प्रस्तावित भागविक्रीचे व्यवस्थापन बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्सकडून पाहिले जात आहे. भागविक्रीच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीपैकी, १४ कोटी रुपये हे वाढत्या कार्यदेशांची पूर्तता करण्यासाठी आणि साहित्य खरेदी करण्यासाठी खेळते भांडवल म्हणून वापरण्याचे कंपनीने प्रस्तावित केले आहे. उर्वरित निधी व्यवसाय विकास आणि विपणन क्षमता मजबूत करण्यासाठी केला जाईल. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचिबद्ध केले जाणार आहेत.