लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयासाठी सर्वाधिक बळकटी मिळवून देणारा विद्यमान आठवडा हा त्याच्या मूल्यात एक टक्क्यांहून अधिक अशी दोन वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा ठरला. १३ जानेवारी २०२३ नंतरची सर्वाधिक साप्ताहिक वाढ आहे.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या स्थिर किमती, डॉलर निर्देशांकातील घसरण आणि रिझर्व्ह बँकेकडून तरलतेला पूरक उपायांसह, परकीय चलन बाजारातील संभाव्य हस्तक्षेप अशा अनेक घटकांमुळे या आठवड्यात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत एक टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या सत्रात रुपया ८६ च्या पातळीपर्यंत मजबूत झाला. सत्रादरम्यान तो ८५.९३ प्रति डॉलर या १० आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. सलग आठव्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला असून ही त्याची दोन वर्षातील सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी ठरली आहे. सरलेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत तो १.२ टक्क्यांनी वधारला आहे. चालू वर्षात ९ जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत ८५.८६ या पातळीजवळ रुपया होता, त्यानंतर रुपयाची ही सर्वोत्तम पातळी आहे.

गेल्या काही सत्रांपासून रिझर्व्ह बँकेने डॉलर तरलता प्रदान केल्याने आणि चलन बाजारात तिच्या नियमित हस्तक्षेपामुळे रुपया गेल्या काही सत्रांपासून वधारत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले. तर स्थिर परदेशी गुंतवणूक प्रवाह, खनिज तेलाचे घसरलेले दर, देशांतर्गत नियंत्रित चलनवाढ आणि कमी होत चाललेली व्यापार तूट यामुळेही रुपयाला आधार मिळाला आहे, असे बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ आदिती गुप्ता म्हणाल्या.

व्यापार तुटीत घट

फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट १४.०५ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे एकूण व्यापार अधिशेष ४.५ अब्ज डॉलर इतका झाला आहे. जानेवारीमध्ये ही तूट जवळपास २३ अब्ज डॉलर नोंदवली होती. वार्षिक आधारावर, फेब्रुवारी २०२४ मध्ये वस्तूंमधील व्यापार तूट १९.५१ डॉलरच्या तुलनेत कमी झाली. आयातीत घट आणि निर्यात तुलनेने टिकून राहिल्याने फेब्रुवारीमधील तूट ऑगस्ट २०२१ नंतरची सर्वात कमी असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये व्यापारी मालाची निर्यात १०.९ टक्क्यांनी घटून ३६.९१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर वस्तूंची आयात १६.३५ टक्क्यांनी कमी होऊन ५०.९६ अब्ज डॉलरवर मर्यादित आहे.

Story img Loader