लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काबाबत आक्रमक धोरणांमुळे मंगळवारच्या सत्रात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी घसरगुंडी दर्शविली. अमेरिकी तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या विक्रीनंतर बाजार सावरला असून डॉलरच्या मूल्यात वाढ झाली आहे.

रुपया डॉलरच्या तुलनेत ८६.५६ पातळीवर बंद झाला, तो एका सत्रात २५ पैशांनी अर्थात ०.२ टक्क्यांनी घसरला आहे. १६ जानेवारीनंतरची ही रुपयाची सत्रातील सर्वात मोठी घसरण आहे.

दिवसभरातील सत्रात रुपयाने प्रति डॉलर ८६.५० चा उच्चांक आणि ८६.५७ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. सोमवारच्या सत्रात रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८६.३१ पातळीवर बंद झाला होता. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनेदेखील कमकुवत झाली. चिनी युआन ०.४ टक्क्यांनी घसरून ७.२८ वर पोहोचला, तर डॉलर निर्देशांक ०.१ टक्क्यानी वधारून १०७.९ पातळीवर पोहोचला.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने, तेथील आयातीवरील नवीन सार्वत्रिक शुल्क २.५ टक्क्यांपासून सुरू करण्याचे आणि ते दरमहा हळूहळू वाढवावे असे धोरण आखल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर डॉलरमध्ये सशक्तता आली. अमेरिकेतील तांबे आणि ॲल्युमिनियम आयातीवर कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळेही डॉलरला आधार मिळाला. मात्र चीनच्या ‘डीपसीक’च्या धास्तीने अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा मारा सुरू झाल्याने डॉलर निर्देशांक १०६.९६ या पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

ट्रम्प यांच्या धोरण धडाक्यातील अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. व्यापार शुल्काच्या चिंतेव्यतिरिक्त, स्थानिक बाजारातून परकीय गुंतवणुकीचे सतत होत असलेले बहिर्गमनदेखील रुपयासाठी मारक ठरले आहे, जानेवारीमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारासह रोख्यांमधून ८.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक निधी काढून घेतला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने बाजारातील तरलता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या घोषणेनंतर मंगळवारी डॉलर-रुपया फॉरवर्ड प्रीमियममध्ये घट झाली. एक वर्षाच्या डॉलर-रुपयावरील सौद्यांवरील उत्पन्न ११ आधारबिदूंनी घसरून २.१७ टक्क्यांपर्यंत खाली आले.