मुंबई: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन आणि बलाढ्य बनलेल्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत निरंतर कमजोर बनत चालेला रुपया मंगळवारी ८ पैशांनी घसरून ८६.९६ असा ८७ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला.
स्थानिक चलन बाजारात, रुपयाने ८६.९४ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रात त्याने ८६.९१ या उच्चांकी तर ८६.९८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर सत्रात तो ८६.९६ प्रति डॉलर पातळीवर विसावला. त्याच्या मागील बंदपेक्षा ८ पैशांची घसरण नोंदवली गेली. सोमवारी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी घसरून ८६.८८ वर बंद झाला होता.देशाच्या व्यापार तुटीत वाढ होत असून रुपयावरील दबाब वाढला आहे. जानेवारीमध्ये भारताची निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घटली, ती वार्षिक आधारावर २.३८ टक्क्यांनी घसरून ३६.४३ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली, तर व्यापार तूट या महिन्यात २२.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या मागणीतील वाढीमुळे जानेवारीमध्ये आयात वार्षिक आधारावर १०.२८ टक्क्यांनी वाढून ५९.४२ अब्ज डॉलरवर पोहोचली. तसेच परकीय चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक १०६.९५ पातळीवर पोहोचला आहे. परिणामी रुपया अधिक कमकुवत झाला आहे.