मुंबईः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपया सोमवारी ५५ पैशांनी गडगडून ८७.१७ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको, चीन या देशांतून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तूंवर अतिरिक्त कर लादल्याने व्यापार युद्धाचा भडका उडण्याच्या धास्तीने रुपयाच्या मूल्य तळाला पोहोचले.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकी डॉलर आणखी भक्कम झाला असून, जागतिक भांडवली बाजारात पडझडीचे पडसाद उमटले. परकीय चलन बाजारात सोमवारी रुपयाची सुरूवात घसरणीने झाली. तो दिवसभरात ८७.२९ या नीचांकी पातळीवर घसरला. अखेर बाजार बंद होताना रुपया हा गेल्या सत्राच्या तुलनेत ५५ पैशांच्या घसरणीसह ८७.१७ रुपयांवर स्थिरावला. याआधीच्या सत्रात रुपया ८६.६२ च्या पातळीवर बंद झाला होता.
याबाबत मिरे ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले की, देशांतर्गत बाजारपेठेतून परकीय गुंतवणूकदार निधी काढून घेत आहेत. यातच डॉलर आणखी भक्कम होत असल्याने रुपयातील घसरण सुरू राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने लादलेल्या व्यापार शुल्कामुळे जगभरात चिंता निर्माण झाली असून, त्याचा दबाव रूपयावर येत आहे. मात्र, यात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्यास रुपयाला पाठबळ मिळू शकते. तथापि रुपयातील घसरण सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेपही ढळत चालल्याने चलन बाजारातील नकारात्मकता वाढत चालली आहे.
परकीय गंगाजळीत वाढ
देशातील परकीय गंगाजळीत २४ जानेवारीअखेर संपलेल्या सप्ताहात ५.५७ अब्ज डॉलरने वाढ होऊन ती ६२९.५५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. आधीच्या सप्ताहात परकीय गंगाजळीत १.८८ अब्ज डॉलरची घट होऊन ती ६२३.९८ अब्ज डॉलरवर आली होती.
सोने ८५ हजारांपुढे!
सोन्याचा भाव सोमवारी राजधानी नवी दिल्लीत ४०० रुपयांनी वाढला आणि प्रति तोळा ८५,००० रुपयांचा टप्पा त्याने पहिल्यांदाच ओलांडला. जागतिक अस्थिरतेतून भाव आणखी भडकण्याच्या शक्यतेने सराफ आणि स्टॉकिस्ट्सकडून वाढलेल्या मागणीमुळे दिल्लीत सोने आता ८५,३०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे. सोमवारी सलग पाचव्या सत्रात तेजीने, चांदीचा भाव आणखी ३०० रुपयांनी वाढून ९६,००० रुपये प्रति किलो झाला.