मुंबईः आंतरराष्ट्रीय स्तरावर सुदृढ बनत चाललेल्या अमेरिकी डॉलरपुढे रुपया पूर्णपणे नतमस्तक झाला असून, सोमवारी त्याने १२ पैशांच्या घसऱणीसह प्रति डॉलर ८४.७२ या नवीन नीचांकाला गाठले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिक्र्स देशांच्या स्वतंत्र चलनाच्या योजनेबाबत दिलेल्या कठोर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी सर्वच आशियाई चलनांनी डॉलरपुढे नांगी टाकली. बरोबरीने देशांतर्गत घसरलेल्या जीडीपीची आकडेवारी आणि उत्पादन क्षेत्राचे मंदावलेपण या गोष्टीही चलन बाजारातील व्यवहारांवर नकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या ठरल्या. त्यामुळे आंतरबँक चलन व्यवहारात ८४.५९ या पातळीवर खुले झालेल्या रुपयांच्या व्यवहारांनी, ८४.७३ च्या नीचांकापर्यंत वळण घेतले. शुक्रवारच्या सत्रातही रुपयाचे मूल्य १३ पैशांच्या घसरणीसह ८४.६० या डॉलरपुढील नव्या सार्वकालिक तळापर्यंत ढासळले होते.

हेही वाचा >>> सचिन बन्सल यांची नवी फिनसर्व्ह महिनाभरातच निर्बंधमुक्त

दुसरीकडे जीडीपी घसरण, ट्रम्प यांच्या धमक्यांना दुर्लक्षित करून सोमवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह स्थिरावले. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक या ब्लू-चिप समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे वरील प्रतिकूल घटकांकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले.

शुक्रवार आणि सोमवारच्या सत्रात मिळून रुपया तब्बल २५ पैशांनी गडगडला आहे, त्या उलट सेन्सेक्स याच दोन दिवसांत तब्बल १,२०० हून अधिक अंशांनी वधारला आहे. बाजारात खरेदीचा मूड बहरत असला तरी ही खरेदी परकीय गुंतवणूकदारांकडून नव्हे तर देशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असल्याने त्याचा रुपयाला बळ देणारा परिणाम दिसून येत नसल्याचे विश्लेषकांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>> Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच

सोमवारी सत्रारंभीच्या घसरणीची वेगाने भरपाई करत, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४५.२९ अंश (०.५६ टक्के) वाढीसह दिवसअखेरीस ८०,२४८.०८ वर स्थिरावला. दिवसाच्या सुरुवातील तो ७९,३०८.९५ असा जवळपास ५०० अंशांनी गडगडला होता, मात्र त्या पातळीपासून सुमारे हजार अंशांची झेप घेत त्याने ८०,३३७.८२ च्या उच्चांकाला गवसणी घातली. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १४४.९५ अंशांनी (०.६० टक्के) वाढून २४,२७६.०५ वर दिवसअखेरीस पोहोचला.

व्यापक बाजाराला खरेदीचा लाभ झाला. परिणामी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १.०५ टक्के आणि ०.८४ टक्के असे सरस प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील तब्बल २,५०८ समभाग वाढले, तर १,५५० समभाग घसरणीत राहिले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee falls 12 paise to all time low of 84 72 against dollar print eco news zws