मुंबई: डॉलरमागे ८५.८१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीपर्यंत गडगडलेला रुपया मध्यवर्ती बँकेकडून झालेल्या हस्तक्षेपामुळे शुक्रवारी काहीसा सावरू शकला. त्यापूर्वी डॉलरच्या तुलनेत तब्बल ५४ पैशांच्या त्याच्या दोन वर्षांतील तीव्र घसरणीने चलन बाजारात थरकाप उडवून दिला. सत्राअखेर २७ पैशांच्या घसरणीसह प्रति डॉलर ८५.५३ या विक्रमी तळाशी रुपया स्थिरावला.
आंतरबँक चलन व्यवहारात आयातदारांकडून महिनाअखेर मागणी वाढल्याने डॉलरने लक्षणीय बळकटी कमावली आणि ज्यातून रुपयाच्या विनिमय मूल्याला मोठे नुकसान पोहचविले. विश्लेषकांच्या मते, डॉलर-रुपया चलनाचे अल्प-मुदतीच्या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्सची सौदापूर्ती, मुख्यत: खनिज तेलाच्या आयातदारांनी महिनाअखेरीस डॉलरमधील दायित्वांची पूर्तता करण्यासाठी केलेली घाई, तसेच भांडवली बाजारात विक्री करून माघारी परतत असलेल्या गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीने रुपयाच्या मूल्याला मोठा ताण दिला.
हेही वाचा >>> बजाज ऑटोकडून नवीन इलेक्ट्रिक चेतक दाखल
देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदावलेपण तसेच व्यापार तुटीत मोठी वाढ ही चलन बाजारातील वाढत्या नकारात्मकतेचे कारण बनली आहे. त्यातच बाजारातून परदेशी निधीचा सतत सुरू असलेला बहिर्प्रवाह आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची पीछेहाट अलीकडच्या काळात वेगाने सुरू आहे.
परकीय चलन बाजारात, रुपयाने ८५.३१ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. पुढे घसरण वाढत जाऊन ५४ पैशांपर्यंत विस्तारली आणि ८५.८१ या अभूतपूर्व नीचांकी पातळीवर रुपयाने गटांगळी घेतली. याआधी २ फेब्रुवारी २०२३ रोजी रुपयाने एका सत्रात ६८ पैशांची तीव्र घसरण नोंदवली होती, त्यानंतरची ही दुसरी मोठी घसरण आहे. दिवसअखेर तो २७ पैशांनी घसरून ८५.५३ या नीचांकी पातळीवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने सलग आठव्या सत्रात नवीन नीचांकपद गाठले आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरून ८५.२७ पातळीवर विसावला होता.
मध्यवर्ती बँकेकडे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मुदतपूर्ती असलेले २१ अब्ज डॉलरचे करन्सी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ज्यामुळे बाजारातील डॉलरची तरलता खूपच आटली आहे. महिन्याच्या अखेरीस आयातदारांकडून डॉलरची वाढती मागणी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून निधीच्या बहिर्गमनामुळे रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली, असे मत मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी नोंदविले.