मुंबई: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांच्या भीतीने जागतिक पातळीवर व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. परिणामी जोखीम टाळण्याच्या गुंतवणूकदारांच्या भावनेने बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी गडगडून प्रति डॉलर ८७.४६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे अमेरिका आणि प्रत्युत्तरादाखल चीनकडून लादल्या जाणाऱ्या शुल्काच्या परिणामांबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यातून डॉलरच्या तुलनेत जगभरातील अन्य देशांची चलने कमकुवत झाली आहेत. त्याचाच विपरित परिणाम रुपयावर देखील दिसून आला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे चलन बाजाराचे लक्ष आहे.

परकीय चलन बाजारात, रुपयाने ८७.१३ प्रतिडॉलर पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान तो ८७.४९ या नीचांकी पातळीवर पोहोचला आणि सत्रसमाप्तीला ८७.४६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर तो स्थिरावला. मागील बंदच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी घसरला आहे. मंगळवारी, रुपया त्याच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवरून ४ पैशांनी वधारला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो ८७.०७ पातळीवर बंद झाला होता. चीनमधून वस्तू आयात करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांवर १० टक्के कर लादण्याचा ट्रम्प विचार करत आहेत. त्याला उत्तर म्हणून मंगळवारी चीनने काही अमेरिकी उत्पादनांवर कर लादण्याची घोषणा केली. देशांतर्गत आघाडीवर देखील रिझर्व्ह बँक शुक्रवारी रेपो दराची घोषणा करणार आहे. मध्यवर्ती बँकेकडून पाव टक्के कपात केली जाण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या चार वर्षांतील पहिली कपात असेल. या आधी करोना काळात टाळेबंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे २०२० मध्ये रेपो दर ४० आधारबिंदूंनी कमी करून ४ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.