मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण तीव्र झाली असून त्याने ८४.४३ असा प्रति डॉलर ऐतिहासिक नीचांक गुरुवारी नोंदविला. आंतरबँक चलन व्यवहारात शुक्रवारी रुपया आणखी ४ पैशांनी घसरून त्याने ८४.४३ हा नवीन तळ दाखविला. किरकोळ आणि घाऊक महागाईचा उडालेला भडका आणि भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा आणि गुंतलेला पैसा काढून घेण्याचा क्रम सुरू आहे. परिणामी डॉलरची मागणी वाढली असून, त्यापरिणामी रुपया अधिक कमजोर झाला आहे.
हेही वाचा >>> भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
आंतरबँक चलन व्यापारात रुपयाने ८४.४० रुपयांवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान, रुपयाने प्रति डॉलर ८४.३९ चा उच्चांक तर ८४.४३ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर तो ८४.४३ या ताज्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर स्थिरावला आणि मागील बंदच्या तुलनेत ४ पैसे घसरला आहे. बुधवारी, रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८४.३९ वर स्थिरावला होता. अमेरिकी डॉलर निर्देशांकानेदेखील १०६.७६ हा उच्चांक गाठला आहे.
अर्थव्यवस्थेसाठी घातकच…
डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आल्याने आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. तेलाच्या आयातीवर खर्चात लक्षणीय वाढ ही एकंदर चलनवाढ आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणारी ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा महागाई वाढीची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. अमेरिकेला महागाईच्या आघाडीवर कोणताही दिलासा मिळालेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मुख्य महागाईदर सलग तिसऱ्या महिन्यात ०.३ टक्क्यांनी वाढला आहे.