मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी चालू महिन्यांतील सर्वात मोठ्या ३८ पैशांच्या घसरणीने ८७.३३ च्या पातळीपर्यंत खाली आला. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे खनिज तेलाच्या भावातील अस्थिरतेचा प्रामुख्याने रुपयाच्या मूल्याला फटका बसला.

आंतरबँक चलन विनिमय बाजार सकाळी सुरुवात रुपयातील मोठ्या घसरणीने झाली. दिवसभरात तो ८७.३६ या नीचांकी पातळीवर रोडावला. अखेर बाजार बंद होताना तो ८७.३३ च्या पातळीवर स्थिरावला. तरी शुक्रवारच्या सत्राच्या तुलनेत रुपया ३८ पैशांनी घसरला. शुक्रवारी रुपया १७ पैशांनी वधारून प्रति डॉलर ८६.९५ पातळीवर होता. याआधी ५ फेब्रुवारीला रुपया एकाच दिवसात ३९ पैशांनी घसरला होता. मागील सत्रात जागतिक पातळीवर अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या धमक्यांमुळे अनिश्चितता निर्माण झाला आहे. यामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतही अस्थिरता आली असून, देशाच्या भांडवली बाजारातून डॉलररूपाने परकीय निधीचे निर्गमनही अव्याहतपणे सुरू आहे.

रुपया कमकुवत झाल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात विक्रीचा मारा कायम राहिला. याचा रुपयाच्या मूल्यावर आणखी प्रतिकूल परिणाम झाला, अशी माहिती परकीय चलन व्यापारांनी दिली. काही दिवसांपूर्वी पिंपामागे ६६ डॉलरखाली गेलेले खनिज तेलाचे भाव पुन्हा तापत चालल्याची चिन्हे आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेत फेब्रुवारीत बेरोजगारीचे प्रमाण ४.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याच्या घटनेनेही नकारात्मकतेत भर घातली.

Story img Loader