मुंबई : शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारून ८५.४९ पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार परतल्यामुळे मार्च महिन्यात रुपया डॉलरच्या तुलनेत २.१७ टक्क्यांनी वधारला असून, सहा वर्षांहून अधिक काळातील ही त्याची सर्वोत्तम मासिक कामगिरी आहे.

या आधी नोव्हेंबर २०१८ या महिन्यांत रुपयाने ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रुपया २ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. २ एप्रिल २०२४ रोजी त्याचे मूल्य ८३.४२ प्रति डॉलर राहिले होते. मात्र मार्च महिन्यात भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात परदेशी निधीच्या ओघामुळे रुपयाने चांगली वाढ साधली.

गेल्या सलग सहा सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी ३२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी परकीय चलन बाजारात, रुपयाने ८५.६४ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि नंतर ८५.४० ही उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर २५ पैशांनी वधारून रुपया ८५.४९ प्रतिडॉलरवर बंद झाला.