मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने सलग तिसऱ्या सत्रात नांगी टाकली असून मंगळवारी रुपया ५० पैशांनी घसरून ८६.२६ प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. जागतिक व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाल्याने वित्तीय बाजारपेठेतील वाढत्या अस्वस्थतेचेच प्रतिबिंब रुपयाच्या तीन महिन्यांतील एका सत्रातील सर्वात मोठ्या घसरगुंडीत दिसून आले.

परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि परदेशी भांडवलाच्या निर्गमनामुळे रुपयात मोठी घसरण सुरू आहे. शिवाय, अमेरिकेला प्रत्युत्तर देणाऱ्या चीनवर ५० टक्के दंडात्मक अतिरिक्त कर लादण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धमकीनंतर जागतिक बाजारपेठेत प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.

रुपयाने ८५.८९ या पातळीवरून मंगळवारी व्यवहारास सुरुवात केली होती. सत्रात ८५.८२ या उच्चांकी आणि ८६.२९ च्या नीचांकी पातळीला त्याने स्पर्श केला. कॅलेंडर वर्षात १३ जानेवारीला डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ पैशांनी घसरला होता. सोमवारी, डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशांनी घसरून ८५.७६ वर स्थिरावला होता, तर गेल्या आठवड्यात शुक्रवारी तो १४ पैशांनी घसरला होता. म्हणजेच गेल्या तीन सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ९६ पैशांनी घसरला आहे.

आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने आणि भारतीय शेअर बाजारातून परकीय निधीचा सतत होणारा ओघ यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली. परिणामी, या महिन्यात रुपया हे आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन ठरले आहे. बाजारातील भावना अजूनही नकारात्मक असल्याने रुपयांत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले.