मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने सोमवारी सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली. रुपयाच्या मूल्यात एकाच दिवसात झालेली ही दोन वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली. डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ६६ पैशांनी गडगडून ८६.७० या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.
सोमवारच्या सत्रात रुपयात ०.७ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रुपयात एवढी मोठी घसरण झाली होती. सरलेल्या वर्षभरात १ जानेवारी २०२४ च्या ८३.१९ या पातळीपासून रुपया तब्बल ४ टक्क्यांनी गडगडला आहे. त्यापैकी २ टक्के मूल्य ऱ्हास हा घसरणीची तीव्रता वाढलेल्या डिसेंबर महिन्यांपासून झाला आहे. अमेरिकेत यापुढे व्याजदरात कपात न होण्याची शक्यता असून, यातून बळावलेल्या डॉलरसह, मध्यवर्ती बँकेकडून रुपयाला सावरण्यासाठी हस्तक्षेप घटल्याने चलनाच्या मूल्याचे मोठे नुकसान सुरू आहे.
देशाच्या विकास दराची मंदावलेली गती आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा पिंपामागे ८० डॉलरपुढे सुरू असलेल्या भडक्याने चलन बाजारातील नकारात्मकतेला खतपाणी घातले. भारताचे आकर्षण संपुष्टात येऊन, देशांतर्गत भांडवली बाजारातून बाहेर जात असलेली गुंतवणूक देखील रुपयाच्या घसरणीचे कारण ठरले आहे.
हेही वाचा >>> चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
परकीय चलन गंगाजळीला तडे
देशातील परकीय गंगाजळीत डिसेंबरपासून मोठी घट नोंदविण्यात येत आहे. यंदा ३ जानेवारीअखेर संपलेल्या सप्ताहात परकीय गंगाजळी ६३४.६ अब्ज डॉलरवर आली. ही १० महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करून डॉलरची विक्री करते. रिझर्व्ह बँकेने सोमवारी डॉलरची विक्री केली परंतु, ती रुपयात आधी झालेल्या घसरणीवेळी केलेल्या विक्रीपेक्षा कमी होती. केवळ रुपयाच नव्हे तर आशियातील इतर चलनांमध्येही डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे.
रिझर्व्ह बँकेकडे पर्याय मर्यादित
गेल्या काही दिवसांपासून नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने रुपयात घसरण सुरू आहे. रिझर्व्ह बँकेकडून जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत ही घसरण सुरू राहील. मात्र घटलेली परकीय गंगाजळी पाहता, मध्यवर्ती बँकेपुढे पर्यायही मर्यादित आहेत, असे आरबीएल बँकेचे कोषागार प्रमुख अंशुल चांडक यांनी मत व्यक्त केले.