मुंबई : विविध देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे भारतीय रुपया नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात तणावाखाली होता. मात्र वर्षसांगतेच्या शेवटी मार्च महिन्यात डॉलरच्या तुलनेत तो तब्बल ३३ पैशांनी सावरला. इतर आशियाई चलनांनी देखील अमेरिकी चलनाच्या तुलनेत सशक्तता मिळविली.‘ब्लूमबर्ग’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०२५ च्या अखेरीस अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ०.२२ टक्क्यांनी सावरला. परिणामी मार्चमध्ये रुपया तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. रुपयाव्यतिरिक्त, तैवानी डॉलर ०.०१ टक्के, चिनी रॅन्मिन्बी ०.५८ टक्के आणि मलेशियन रिंगिट ०.७६ टक्क्यांनी वधारला.

बुधवारच्या सत्रात रुपया २ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८५.५२ पातळीवर बंद झाला. रुपयाने ८५.६५ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि नंतर दिवसभरात ८५.५० चा उच्चांक आणि ८५.७३ चा नीचांक त्याने गाठला होता,डॉलरच्या तुलनेत रुपया सावरण्यासाठी पुढील घटक मुख्यतः कारणीभूत ठरले आहेत.

एफआयआय आवक

मार्च महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय समभागांमध्ये निव्वळ खरेदीदार ठरले आहेत. सरकारी रोख्यांमध्ये परकीय गुंतवणूक २१,००० कोटी रुपयांनी वाढली आहे. सलग दोन महिने परदेशी निधीचे बहिर्गमन झाल्यानंतर मार्चमध्ये २ अब्ज डॉलरचा निव्वळ परकीय गुंतवणूकदारांचा प्रवाह राहिला आहे.

कमकुवत डॉलर निर्देशांक

सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकी चलनाचे मूल्य मोजणारा डॉलर निर्देशांक १ एप्रिल रोजी १०४.१६ पर्यंत घसरला आहे, जो ३ मार्च रोजी १०६.७४ नोंदवला गेला होता. जेव्हा जेव्हा डॉलर निर्देशांक घसरतो, तेव्हा रुपया वाढतो. अमेरिकेतील गुंतवणूकदारांना भारतात जास्त परतावा मिळण्याची संधी दिसते, त्यावेळी त्या गुंतवणूकदारांचा ओघ देशांत परततो. डॉलर निर्देशांक हा युरो, जपानी येन, पौंड स्टर्लिंग, कॅनेडियन डॉलर, स्वीडिश क्रोना आणि स्विस फ्रँकच्या तुलनेत डॉलरच्या मूल्याचे मोजमाप आहे. जर डॉलर निर्देशांक वर गेला तर तो अमेरिकी डॉलरच्या ताकदीचे लक्षण मानले जाते

व्यापार तूट

भारताच्या व्यापार तूट देखील कमी झाल्याने त्याचा देखील रुपयावर सकारात्मक परिणाम झाला आहे. नजीकच्या भविष्यात रुपयावर दबाव येण्याची शक्यता कमी आहे. भारताची व्यापार तूट फेब्रुवारीमध्ये १४.०५ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली. जानेवारीमध्ये ही तूट जवळजवळ २३ अब्ज डॉलर होती. फेब्रुवारीमध्ये आयातीत घट झाल्यामुळे आणि निर्यात तुलनेने टिकून राहिल्याने ऑगस्ट २०२१ नंतर फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी तूट नोंदवली गेली.

खनिज तेलाच्या किमती आवाक्यात

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे तेल विपणन कंपन्यांकडून डॉलरची मागणी कमी होत आहे. यामुळे रुपयावरील दबाव कमी होत आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये खनिज तेलाची किंमत जानेवारीमध्ये प्रति पिंप ८० डॉलरवरून ७४ डॉलरपर्यंत कमी झाली आहे. अमेरिकेने तेल उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या दबावामुळे खनिज तेलाच्या किमती अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रतिपंप ६५ ते ७५ डॉलरदरम्यान राहण्याची आशा आहे.

विदेशांतून उसनवारी

भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मक किमतींवर परदेशातील कर्जे घेण्याची क्षमता देखील रुपयाला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मार्चमध्ये, तीन कंपन्यांनी बाह्य व्यावसायिक कर्जांद्वारे निधी उभारला.