मुंबई : जवळजवळ दोन वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी झेप नोंदवत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मंगळवारी रुपया ६६ पैशांनी वधारला आणि ८६.७९ वर बंद झाला. रिझर्व्ह बँकेसह, बँकांनी केलेली डॉलरची विक्री रुपयाला सावरणारी ठरली. जगभरातील व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे चलन बाजारात मंगळवारी मोठी अस्थिरता होती. तथापि सोमवारप्रमाणेच, ८८ च्या समीप गेल्यानंतर मंगळवारीही रुपयाचे मूल्य नाट्यमय कलाटणी घेत तीव्र स्वरूपात वाढताना दिसून आले. मागील बंद पातळीपेक्षा ६६ पैशांची रुपयाने साधलेली वाढ ही दोन वर्षांतील सर्वोत्तम झेप ठरली. यापूर्वी ३ मार्च २०२३ रोजी एका दिवसात रुपया ६३ पैशांनी वधारला होता.
सोमवारच्या सत्राच्या पूर्वार्धात देखील रुपया ४५ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८८ च्या जवळ पोहोचला होता. परंतु रिझर्व्ह बँकेच्या वतीने बँकांनी केलेल्या डॉलर विक्रीमुळे रुपयाला त्या नीचांकी पातळीवरून सावरण्यास मदत झाली असण्याचा चलन बाजारातील व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सोमवारी रुपया ५ पैशांनी वधारत ८७.४५ वर स्थिरावला होता.
रिझर्व्ह बँकेचे ४ अब्ज डॉलर खर्ची पडले?
रिझर्व्ह बँकेने रुपयाला आधार देण्यासाठी किमान ४ अब्ज डॉलरची विक्री सोमवारी आणि मंगळवारच्या सत्रातही केली असावी, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने व्यापाऱ्यांचा हवाला देत दिले आहे. मिरॅ अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांच्या मते, रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपया जवळजवळ १ टक्क्यांनी वधारला आहे. ज्या परिणामी दोन वर्षांतील सर्वोत्तम मजबूती रुपयाला मिळविता आली आहे. नजीकच्या काळात, ८६.५० ते ८७.२० या श्रेणीत रुपयाने व्यापार करण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.