Rupee Vs Dollar : विदेशी बाजारात डॉलरची मजबुती आणि सतत परकीय भांडवलाचा ओघ यामुळे आंतरबँक परकीय चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १४ ऑगस्ट रोजी प्रथमच १० महिन्यांच्या नीचांकावर आला असून, ८३ रुपयांच्या खाली घसरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि गुंतवणूकदारांची जोखीम कमी झाल्यानेही रुपयावर दबाव वाढला आहे. १४ ऑगस्टला सकाळी ९.१० वाजता रुपया ८३.०६ वर व्यवहार करीत होता, जे ८२.८४ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ०.२५ टक्क्यांनी कमी होते. रुपयाने यापूर्वी ८३.०८ चा नीचांक गाठला होता, ही पातळी शेवटची २० ऑक्टोबर २०२२ रोजी दिसली होती.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्यानंतर इक्विटी आणि चलन बाजार या दोन्हींमध्ये घसरण सुरूच राहिली आहे, ज्याने तेल प्रति बॅरल ८७ डॉलरपर्यंत पोहोचले. चीनमधील निराशाजनक आर्थिक आकडेवारीनेही बाजाराला कमकुवत केले आहे. यूएस चलनवाढीची आकडेवारी सुरुवातीच्या अंदाजांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी वाढ दाखवतेय, दुसरीकडे प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स (PPI) डेटाने अंदाजित पातळी ओलांडून डॉलरची स्थिती सुधारण्यात भूमिका बजावली आहे.
हेही वाचाः Twitter वरून कमाई करताय, मग तुम्हाला ‘एवढा’ टक्के जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
CR फॉरेक्सचा असा अंदाज आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे मजबूत हस्तक्षेप रुपयाला ताकद देऊ शकेल, ज्यामुळे रुपया ८२.९० ते ८३.२५ च्या श्रेणीत जाण्यापासून प्रतिबंधित होईल. अशा परिस्थितीत निर्यातदारांनी रुपयाच्या मूल्यातील घसरणीमुळे उद्भवणार्या शक्यतांचा विवेकपूर्वक फायदा घ्यायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. तर आयातदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांचे निर्णय अंतिम करण्यापूर्वी योग्य हेजिंग पर्याय उदयास येण्याची प्रतीक्षा करावी, असे त्यात म्हटले आहे.
हेही वाचाः महाराष्ट्राचे वित्तीय आरोग्य देशात सर्वोत्कृष्ट; बंगाल, गुजरात आणि केरळ कोणत्या स्थानी?
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ८३.०४ वर उघडला आणि नंतर प्रति डॉलर ८३.०७ वर आला. मागील बंद पातळीच्या तुलनेत ही २५ पैशांची घसरण आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.८२ वर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या बास्केटच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी वाढून १०३.०१ वर पोहोचला. तसेच जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.८९ टक्क्यांनी घसरून ८६.०४ डॉलर प्रति बॅरल होते. १० वर्षांत अमेरिकेचा डॉलर ४.१८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर आशियाई चलनांमध्ये घसरण झाली आहे. फिलिपिन्स पेसो १.१ टक्के, इंडोनेशियन रुपिया ०.७६ टक्के, दक्षिण कोरियाचे वोन ०.७४ टक्के, मलेशियन रिंगिट ०.५३ टक्के, तैवान डॉलर ०.४६ टक्के, चीनचे रॅन्मिन्बी ०.२९ टक्के, थाई बात ०.२७ टक्के, चीन ऑफशोअर ०.२५ टक्के, सिंगापूर डॉलर ०.२४ टक्क्यांनी घसरला आहे. प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन चलनाची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक १०३.०२ वर व्यापार करीत होता, जो त्याच्या आधीच्या १०२.८४ च्या बंदच्या तुलनेत ०.१७ टक्क्यांनी वाढला होता.
याचा परिणाम काय होणार?
रुपयाच्या कमजोरीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत. यामुळे शिपिंग महाग होणार आहे. अशा परिस्थितीत रुपयाच्या कमजोरीमुळे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. याबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे प्रवासी भाडेही वाढू शकते, त्यामुळे प्रवास महाग होऊ शकतो.