पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत उघडल्या गेलेल्या ११.३० कोटी खात्यांमध्ये तब्बल १४,७५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पडून आहे, अशी माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२४ अखेर निष्क्रिय (इनऑपरेटिव्ह) ठरलेल्या जन धन खात्यांमध्ये १४,७५० कोटी रुपये शिलकीत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत ५४.०३ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडील निष्क्रिय जन धन खात्यांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. मात्र मार्च २०१७ मधील ३९.६२ टक्क्यांवरून हे प्रमाण कमी होऊन नोव्हेंबर २०२४ अखेर ते २०.९१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
हेही वाचा : ‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीत ग्राहकाने कोणतेही व्यवहार न केल्यास त्या बचत अथवा चालू खात्यास निष्क्रिय मानले जाते. तथापि १४,७५० कोटी रुपये या प्रत्येक शून्य शिलकी खात्यात सारखे विभागले तरी येणारी १,३०५ रुपयांच्या रकमेबाबत वंचित घटकांमधील खातेदारांकडून कोणतेही व्यवहार होऊ नये, हे एक कोडेच आहे.