मुंबई : धनत्रयोदशीनिमित्त ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यात सोन्याची उलाढाल २७ हजार कोटी आणि चांदीची उलाढाल ३ हजार कोटी रुपयांची आहे. धनत्रयोदशीला सुमारे ४१ टन सोने आणि ४०० टन चांदीची विक्री झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव शुक्रवारी तोळ्याला ६२ हजार रुपये आणि चांदीचा भाव किलोला ७२ हजार रुपये होता. मागील वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव ५२ हजार रुपये तर चांदीचा भाव ५८ हजार रुपये होता. मागील वर्षी धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची एकूण २५ हजार कोटींची उलाढाल झाली होती. यंदा ती ५ हजार कोटींनी वाढून ३० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा : उद्यम पोर्टलवर ३ कोटींहून अधिक MSME कंपन्यांच्या नोंदणीसह १५ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधींची निर्मिती : नारायण राणे

देशभरात सुमारे चार लाख छोटे, मोठे सराफ आहेत. त्यापैकी १ लाख ८५ हजार सराफांची भारतीय मानक विभागाकडे नोंदणी झालेली आहे. मानकांची अंमलबजावणी झालेली नाही, अशा भागात २ लाख २५ हजार छोटे सराफ आहेत. देशातील सोन्याची वार्षिक आयात ८०० टन आणि चांदीची आयात ४ हजार टन आहे.

एकंदर ४० टन सोने खरेदी

“धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाणी, वळे, बिस्किट यांच्याबरोबर दागिने घेण्याचा कल वाढला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याचा भाव खाली आल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. खरेदीसाठी सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची सकाळपासूनच लगबग होती. यंदा १८ कॅरेटप्रमाणे १४ कॅरेटच्या हिऱ्यांच्या दागिन्यांना मागणी असल्याचे दिसले. संपूर्ण दिवाळीत उलाढाल चांगली होण्याची अपेक्षा आहे. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीतून दीर्घकालीन परतावा मिळत असल्याचे लक्षात येत असल्याने सोने गुंतवणुकीचा कल सातत्याने वाढतो आहे”, असे पीएनजी सन्सचे संचालक- मुख्याधिकारी अमित मोडक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ०९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपये एकूण प्रत्यक्ष कर संकलन

“यंदा धनत्रयोदशीला सोन्याचा दर मागील तीन आठवड्यांतील सर्वात कमी दर असल्याने सकाळपासूनच दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी व निमशहरी भागातील आमच्या दालनांमध्ये आगाऊ खरेदी केलेल्या ग्राहकांनी या मुहूर्तावर सोने घ्यायला गर्दी केली होती. धनत्रयोदशीपासून पुढे दिवाळीचा पूर्ण आठवडा व्यवसायासाठी उत्कृष्ट ठरेल. धनत्रयोदशीला भारतात एकूण सराफी क्षेत्रात ४० टन सोन्याची विक्री अपेक्षित असून, त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा ८ ते १० टनांचा असेल. एकंदर कल हा सोने खरेदी ८५ टक्के, हिरे १० टक्के आणि चांदी ५ टक्के असा निदर्शनास आला. एकूणच गेल्या दिवाळीच्या तुलनेत सोने विक्रीत ३० टक्के वाढ अपेक्षित आहे”, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupees 30000 crore gold silver transactions on the occasion of dhanteras print eco news css